शालेय प्रवेशाच्या तोंडावर जन्मदाखला दुरुस्तीची कोंडी; पालकांमध्ये संताप.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी देगलूर नांदेड
देगलूर : शैक्षणिक वर्ष २०२६- २७ साठी शालेय प्रवेश प्रक्रिया सुरू असताना जन्मदाखल्यावरील नावातील व इंग्रजी स्पेलिंगमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पालकांची मोठी धावपळ सुरू आहे. वाढत्या अर्जाचा भार आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे देगलूर नगर परिषदेकडील कामकाज संथ गतीने सुरू असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शालेय प्रवेशासाठी विद्यार्थी तसेच पालकांचे आधार कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने अनेक प्रकरणांमध्ये आधार कार्डावरील इंग्रजी स्पेलिंग आणि जन्मदाखल्यावरील नोंदींमध्ये तफावत आढळून येत आहे. परिणामी,
जन्मदाखल्यातील दुरुस्ती आणि नवीन दाखल्यांसाठी नगर परिषद कार्यालयात अर्जाचा मोठा ओघ वाढला आहे. मात्र,संबंधित विभागात उपलब्ध कर्मचारी संख्या अपुरी असल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून अनेक अर्ज प्रलंबित राहिल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असताना, जन्मदाखल्यातील दुरुस्तीत होणारा विलंब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम करणारा ठरत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे. अनेक पालकांनी नगर परिषद प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्हाध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राहुल शिवाजी पांढरे, विष्णु बालाजी बिरादार आणि पांडुरंग गायकवाड यांनी देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. जन्मदाखला विभागात तातडीने अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत, प्रलंबित प्रकरणे युद्धपातळीवर निकाली काढावीत आणि पालकांची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शालेय प्रवेशाचा हंगाम सुरू असताना नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ येणे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब असल्याचे मत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. जन्मदाखला विभागातील प्रलंबित कामे तातडीने मागी लावण्यात यावीत, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे देगलूर नगर परिषद प्रशासन कितपत गांभीर्याने पाहते आणि पालकांना दिलासा देण्यासाठी कोणत्या उपाययोजना करते, याकडे पालकांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

