देगलूर तालुक्यातील ८६ ग्रा.पं.च्या आरक्षणाची सोडत.८ ते ११ जून या कालावधीत विशेष ग्रामसभा.

देगलूर तालुक्यातील ८६ ग्रा.पं.च्या आरक्षणाची सोडत.

८ ते ११ जून या कालावधीत विशेष ग्रामसभा.

पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी देगलूर 

 देगलूर :आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देगलूर तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींसाठी सदस्य पदांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, ८ ते ११ जून या कालावधीत विशेष ग्रामसभांमधून आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार होणाऱ्या या प्रक्रियेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून इच्छुक उमेदवारांच्या नजरा आता आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत.तहसील प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार अथवा प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. सोडतीनंतर प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात येईल. त्यावर हरकती व सूचना मागवून अंतिम आरक्षणाला मंजुरी दिली जाणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने आरक्षण हा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जात असल्याने अनेक गावांमध्ये इच्छुकांनी मोचेर्बाधणी सुरू केली आहे. काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढविला असून, आरक्षणानुसार निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आरक्षण निश्चितीनंतर अनेक गावांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.प्रशासनाने संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याचा दावा केला असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने विशेष ग्रामसभांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल; चार दिवसांत ठरणार आरक्षण८ जून रोजी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायती, ९ जून रोजी १७, १० जून रोजी १९ आणि ११ जून रोजी २० ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र अधिक स्पष्ट होणार असून गावोगावी राजकीय हालचालींना आणखी वेग येणार आहे.
Previous Post Next Post