*अकोला जिल्हाधिकाऱ्यांची पातुर येथील नवतेजश्विनी शिलाई युनिट व ई-रिक्षाना भेट; महिला बचत गटांच्या कामाचे कौतुक!*
(अकोला पातुर तालुका प्रतिनिधी दूल्हे खान युसुफ खान)
पातूर : स्थानिक लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) पातूर अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या नवतेजश्विनी शिलाई युनिट आणि ई-रिक्षा केंद्राला आज, दिनांक २४ जून २०२६ रोजी अकोल्याच्या माननीय जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि पातूरचे माननीय तहसीलदार राहुल वानखेडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महिला आर्थिक विकास महामाविमच्या वतीने मा.जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली नीता अंभोरे (ADCO),सुनीता चतुरकार (व्यवस्थापक) व रेस्टी प्रशिक्षक श्वेता लोडम यांनी जिल्हाधिकारी महोदयांचे पुष्पगुच्छ, तसेच सीएमआरसी अंतर्गत महिला बचत गटांनी उत्पादित केलेली 'गोळंबी' व महिलांनी तयार केलेले इतर आकर्षक प्रॉडक्ट्स (उत्पादने) भेट देऊन सहर्ष स्वागत केले.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केंद्राच्या विविध उपक्रमांची सविस्तर पाहणी केली. सीएमआरसी अंतर्गत शिलाई युनिटमध्ये कशा पद्धतीने उत्पादन घेतले जाते, शिलाई महिलांचे प्रशिक्षण कसे चालते, तसेच रेस्टी अंतर्गत मुलींना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाबाबत त्यांनी माहिती घेतली. या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांना कशा प्रकारे आर्थिक फायदा होत आहे आणि स्वावलंबनाचे एक नवीन साधन मिळाले आहे, यावरही सविस्तर चर्चा झाली. यासोबतच, महिला बचत गटांसाठी 'ई-रिक्षा' हा उपक्रम कसा फायदेशीर आणि पर्यावरणपूरक ठरत आहे, याचीही माहिती प्रशासनाला देण्यात आली.
पाहणी दरम्यान माननीय जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केंद्रातील दिपाली ससाने (मास्टर ट्रेनर) आणि काम करणाऱ्या महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी व अनुभवांची विचारपूस केली. महिलांच्या या आत्मनिर्भर प्रयत्नांचे त्यांनी भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, लोकसंचालित साधन केंद्राच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि तहसीलदार राहूल वानखेडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल व भेटीबद्दल मनापासून आभार मानण्यात आले.

