श्वेता नगरमधील बेकायदेशीर विषारी कारखान्यावर उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील यांची धडक कारवाई
(प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक )
शहादा, दि. 22: शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील श्वेता नगर परिसरात एका निवासी घरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या व्यावसायिक कारखान्यावर शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई मकरंद पाटील यांनी तात्काळ भेट देऊन धडक कारवाई केली. रहिवासी भागात मानवी आरोग्याशी खेळणारा हा घातक उद्योग कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा देत त्यांनी हा कारखाना तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
श्वेता नगर परिसरातील एका नागरिकाने आपल्या राहत्या घरात बेकायदेशीरपणे धातू वितळवून शुद्धीकरण करण्याचे काम सुरू केले होते. या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर विषारी रसायनांचा वापर केला जात होता. कारखान्यातून निघणारे दूषित पाणी उघड्यावर सोडले जात असल्याने, तसेच हवेत पसरणारी विषारी धूळ आणि दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला होता. याबाबत स्थानिक रहिवाशांनी उपनगराध्यक्षांकडे तक्रार केली होती.
तक्रार प्राप्त होताच उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ श्वेता नगर भागात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका सौ. लताताई शिवदे आणि नगरसेवक सागर मराठे उपस्थित होते.
पाहणीदरम्यान बेकायदेशीर आणि घातक कारभार उघडकीस आल्यानंतर उपनगराध्यक्षा पाटील यांनी संबंधित नगरपालिका अधिकाऱ्यांना सदर कारखाना तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले. तसेच, निर्धारित कालावधीत ही प्रक्रिया बंद न केल्यास संबंधित घरमालकावर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
"परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च आहे. रहिवासी भागात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण किंवा बेकायदेशीर औद्योगिक कामकाज अजिबात सहन केले जाणार नाही," अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई पाटील यांनी दिली.
या धडक कारवाईमुळे श्वेता नगर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, त्यांनी उपनगराध्यक्षा आणि नगरसेवकांचे आभार मानले आहेत.

