तापी नदीवर नवा 'तलाव' उद्घाटनास तयार! श्रेय महामार्ग विभागाला, जीव वाचवला टाकरखेड्याच्या युवकाने...

तापी नदीवर नवा 'तलाव' उद्घाटनास तयार! श्रेय महामार्ग विभागाला, जीव वाचवला टाकरखेड्याच्या युवकाने...

(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील)

शहादा  :  शहादा-दोंडाईचा रस्त्यावरील व नंदुरबार-धुळे या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या सारंगखेडा-टाकरखेडा दरम्यानच्या तापी नदीवरील पुलाची बुधवारी (दि. 1 जुलै) झालेल्या पहिल्याच पावसात दैना उडाली. पुलावरील पाण्याच्या निचऱ्यासाठी बसवलेल्या जाळ्यांमध्ये माती, वाळू आणि मुरुमाचा गाळ अडकल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून अक्षरशः तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते. 

या धोकादायक परिस्थितीमुळे वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला असताना, टाकरखेडा येथील युवक मनोज पानपाटील आणि त्यांच्या मित्रांनी भर पावसात स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी पुलावरील जाळ्यांमधील माती व कचरा काढून पाण्याचा निचरा मोकळा केला. या युवकांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, वाहनधारकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. 

*दरवर्षीचीच समस्या, प्रशासन सुस्त:
स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत सांगितले की, ही समस्या काही नवीन नाही. दरवर्षी पावसाळ्यात याच पुलावर पाणी तुंबते. तरीही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती साफसफाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. पुलाच्या कठड्याजवळ गेल्या अनेक महिन्यांपासून माती, वाळू पडून आहे, त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले. 

*तुटलेले कठडे, अपघाताला निमंत्रण: 
धक्कादायक बाब म्हणजे, या पुलावरील टाकरखेड्याच्या दिशेने दोन ठिकाणी कठडे पूर्णपणे तुटून त्यांची दुरवस्था झाली आहे. या महत्त्वाच्या पुलावरून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. तुटलेल्या कठड्यांजवळूनच वाहने जात असल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. 

*कायमस्वरूपी उपायाची मागणी:
"तात्पुरती साफसफाई नको, तर या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढा," अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. हा प्रश्न केवळ पाणी साचण्याचा नसून थेट नागरिकांच्या जीविताशी व सुरक्षेशी निगडित आहे. त्यामुळे आता तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग येणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post