विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार;
"छात्रों की गूंज" अभियानाला भंडारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
(विलास केजरकर भंडारा. )
भंडारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार "छात्रों की गूंज (विद्यार्थ्यांचा आवाज)" या अभियानांतर्गत भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षा, करिअर, मानसिक आरोग्य तसेच परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेबाबत सविस्तर संवाद साधण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांनी राजस्थानातील कोटा येथे विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रेरणादायी भाषणाचे प्रोजेक्टरद्वारे प्रक्षेपण करण्यात आले. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मांडलेली भूमिका व परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांबाबतचे विचार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारले.
यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "NEET पेपरफुटीसारख्या घटना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या आहेत. मात्र अशा प्रसंगी कोणत्याही विद्यार्थ्याने नैराश्याला बळी पडून चुकीचा निर्णय घेऊ नये. काँग्रेस पक्ष तुमच्या प्रत्येक लढाईत खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. राहुल गांधी यांनी आम्हाला तुमच्यापर्यंत पाठविण्यामागचा उद्देश हा तुमच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करणे आणि तुमच्या समस्या थेट जाणून घेणे हा आहे. भविष्यात शिक्षण, परीक्षा, भरती प्रक्रिया किंवा इतर कोणतीही अडचण निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी न घाबरता आमच्याशी संपर्क साधावा. तुमचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस सदैव संघर्ष करेल." तसेच, 'आकांक्षा'सारख्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे, मेहनतीवर विश्वास ठेवावा आणि अन्यायाविरोधात संघटितपणे आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास विकास राऊत, राकेश बिसेन, NSUI सचिव अक्षत नंदरधने, जिल्हा काँग्रेस सचिव मंगेश हुमणे, रोहित खोब्रागडे, यश चवडे, दत्ता गिरेपुंजे, पार्थ तिरपुडे, दत्ता गौरी, हिमांशू मेंढे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
"छात्रों की गूंज" अभियानामुळे विद्यार्थ्यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ मिळाले असून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा संघर्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

