रावेर तालुक्यात पुनखेडा मुक्ताईनगर मार्गावर बांधकाम खात्याच्या अनोखा कार्यक्रम..रस्त्याचे काम अपुर्ण सोडल्याने वाहधारकांसह प्रवाशांचे हाल ..अपघात होण्याची दाट शक्यता..

रावेर तालुक्यात पुनखेडा मुक्ताईनगर मार्गावर बांधकाम खात्याच्या अनोखा कार्यक्रम..रस्त्याचे काम अपुर्ण सोडल्याने वाहधारकांसह प्रवाशांचे हाल ..

अपघात होण्याची दाट शक्यता..


(जळगाव खान्देश विभागीय संपादक प्रविण मेघे )


रावेर–पुनखेडा–पातोडी मार्गावरील डांबरीकरणाचे काम बहुतांश पूर्ण झाल्याचा दावा संबंधित विभागाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात दुर्गादेवी मंदिरापुढील वळणापासून पुढील काही भाग अद्यापही अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, ज्या भागात डांबरीकरण करण्यात आले आहे, त्या रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून डांबर उखडून खडी बाहेर आली आहे. यामुळे वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून तातडीने दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे.

संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना दुर्गादेवी मंदिरापुढील महत्त्वाचा भाग अपूर्ण का ठेवण्यात आला, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे कामही अद्याप पूर्ण झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून दुर्गादेवी मंदिरापुढील अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करावे, पहिल्याच पावसात उखडलेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी तसेच गावातील रखडलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांनाही गती द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Previous Post Next Post