*आव्हाणे एसटी बस गावात येत नसल्याने ग्रामस्थांना २ कि.मी. पायी प्रवास; विभाग नियंत्रकांकडे तक्रार*
(महाराष्ट्र संपादक : यासीन तडवी यावल जळगाव)
आव्हाणे ते जळगाव ही एसटी बस सेवा पूर्ववत वेळेवर गावापर्यंत सुरू करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान श्रीधर चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
आव्हाणे गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असल्याने काही दिवस एसटी बस फाट्यावरूनच परत जात होती. मात्र रस्त्याचे काम पूर्ण होऊन सुमारे आठ दिवस उलटले असून इतर सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. तरीदेखील एसटी बस आजही गावात न येता फाट्यावरूनच परत जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यामुळे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच जळगाव येथे शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. फाट्यावरून गावापर्यंत सुमारे २ किलोमीटर पायी चालत जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आव्हाणे ते जळगाव एसटी बस सेवा पूर्वीप्रमाणे नियमित व वेळेवर आव्हाणे गावापर्यंत सुरू करण्याचे तातडीने आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, तसेच ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी भगवान श्रीधर चौधरी यांनी विभाग नियंत्रकांकडे केली आहे.

