*कर्तव्यनिष्ठ भाजप कार्यकर्ते युसुफ खान बाबर खान यांना पुण्यस्मरणदिनी भावपूर्ण अभिवादन*
(पातूर : अकोला तालुका प्रतिनिधी दुल्हे खान)
पातूर येथील मुस्लिम समाजातील कर्तव्यनिष्ठ, स्पष्टवक्ते आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय युसुफ खान बाबर खान यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समाज, धर्म आणि जातीपलीकडे जाऊन सर्वांना आपले मानत आयुष्य जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची आठवण आजही अनेकांच्या मनात जिवंत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. प्रवाहाच्या विरोधात जाऊन जनसंघापासून भारतीय जनता पक्षात सक्रिय कार्य करणाऱ्या युसुफ खान यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत योगदान दिले. त्यांच्या निवासस्थानी माजी पंतप्रधान
अटल बिहारी वाजपेई मुरली मनोहर जोशी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी भेट देऊन कार्यकर्त्याप्रमाणे प्रेमाची वागणूक दिली होती. एकता यात्रा एलके आडवाणी रथ यात्रा तसेच संघर्ष यात्रेचे पातूर बसस्थानकावर भव्य स्वागत करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. सहकार क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. तसेच स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर आणि किसनराव राऊत यांच्या निवडणुकांमध्ये तन, मन आणि धनाने पक्षासाठी काम केले.
त्यांच्या प्रामाणिकपणा, निष्ठा आणि समाजाभिमुख कार्याची आठवण आजही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करत, "युसुफ खान बाबर खान आज आपल्यात नसले तरी त्यांचा आदर्शच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल," अशा भावना भानुदास क. यांनी व्यक्त केल्या.

