*शहादा HDFC बँकेत ३३ लाखांचा अपहार : वृद्धेच्या बचतीवर डल्ला, बँकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*
(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील )
शहादा : शहादा येथील HDFC बँकेच्या शाखेत घडलेल्या कथित 33 लाख 5 हजार रुपयांच्या अपहार प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. तक्रारदार वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी आणि सहकाऱ्यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यांमुळे संपूर्ण प्रकरण अधिकच चर्चेत आले असून, शहरातील खातेदारांमध्ये आपल्या ठेवींबाबत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
*वृद्धेची आयुष्यभराची पुंजी गायब:*
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिलेने आयुष्यभर कष्ट करून जमा केलेली लाखो रुपयांची बचत सुरक्षित राहावी या विश्वासाने बँकेत मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवली होती. मात्र, बँकेतील काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ही रक्कम परस्पर वळविण्यात आल्याचा गंभीर संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे वृद्ध महिलेसह संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
*OTP साठी नातेवाईकांचे मोबाईल, खात्याशी छेडछाड:*
नातेवाईकांचा आरोप आहे की, प्रकरण उघडकीस आल्यानंतर संशयिताच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांनी सहकार्य करण्याऐवजी बेबनाव केला. त्यामुळे संशय आणखी गडद झाला. याशिवाय, कथित अपहारासाठी आवश्यक असलेले OTP मिळविण्यासाठी संशयिताने आपल्या पत्नी आणि शालकाचे मोबाईल क्रमांक वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. खातेदारांच्या खात्याशी संबंधित तपशीलांमध्ये बदल करून शहादा शाखेतील अनेक ग्राहकांच्या खात्यांतून लाखोंरुपयांचे व्यवहार झाल्याची शक्यता नातेवाईकांनी वर्तवली आहे. त्यामुळे केवळ एका खात्याची नव्हे, तर मागील काही वर्षांतील सर्व संशयास्पद व्यवहारांची फॉरेन्सिक ऑडिटद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
*ग्राहकांमध्ये दहशत, बँकेचे मौन :*
या प्रकरणानंतर शहरातील अनेक खातेदारांनी आपल्या खात्यांची, मुदत ठेवींची, मोबाईल क्रमांक आणि KYC तपशीलांची पडताळणी सुरू केली आहे. "बँकेत ठेवलेले पैसेही सुरक्षित राहतील का?" असा संतप्त सवाल खातेदार विचारत असून, बँकेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही शहादा शाखेत आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी झाल्याचा दावा होत असल्याने उच्चस्तरीय चौकशीची मागणी तीव्र झाली आहे.
*बँकेची संशयास्पद भूमिका, नियमांना हरताळ:*
एवढे गंभीर आरोप होऊनही बँक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे "एवढ्या गंभीर प्रकरणावर दोन्ही विभाग गप्प का?" असा सवाल नागरिक विचारत आहेत.
या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक कंगोरा आहे. एका ग्राहकाची फोन पे ऑनलाइन बँकिंग सेवा नजरचुकीने ब्लॉक झाली होती. बँकेत गेल्यावर अधिकाऱ्यांनी त्याच्या मोबाईलमधील बँकिंग ॲपमध्ये दुरुस्त्या करून 24 तासांत सेवा सुरू होईल असे सांगितले. मात्र, 48 तासांनंतरही सेवा सुरू न झाल्याने त्याने पुन्हा बँक गाठली. यावेळी त्याच्याकडून लेखी अर्जासह आधार कार्डची प्रत, ऑनलाईन आधार ऑथेंटिफिकेशन आणि फिंगर एक्स्प्रेशन घेऊन त्याची प्रिंट अर्जासोबत जोडली. तरीही पाच दिवस उलटूनही फोन पे सेवा सुरू झालेली नाही.
*मोबाईल नंबर बदलला कसा ?:*
या पार्श्वभूमीवर, वृद्ध महिलेच्या खात्यावरील मोबाईल नंबर बदलताना बँकेने आधार ऑथेंटिफिकेशन व फिंगर एक्स्प्रेशन घेतले होते का, हा कळीचा मुद्दा ठरत आहे. फ्रॉड करणाऱ्याने कोणत्या आधारावर महिलेचा मोबाईल नंबर बदलण्याचे धाडस केले, याचा खुलासा फक्त बँक अधिकारीच देऊ शकतात. मात्र, या प्रकरणातील अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
दोषी कोण, व्यवहार कसे झाले, खात्यांमध्ये फेरफार कसा झाला, OTP चा वापर कोणी केला, इतर खातेदारही फसवणुकीचे बळी आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपास आणि सक्षम यंत्रणांच्या चौकशीनंतरच मिळणार आहेत. तोपर्यंत शहाद्यातील HDFC खातेदारांच्या मनातील भीती कायम राहणार आहे.

