अजित दादा पवार जयंती सप्ताहानिमित्त देगलूरमध्ये उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव

अजित दादा पवार जयंती सप्ताहानिमित्त देगलूरमध्ये उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव

(माहेमूद पिंजारी 
तालुका प्रतिनिधी देगलूर )

देगलूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देगलूर शहर शाखेच्या वतीने स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त देगलूर शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात विविध शाळांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष प्रतिनिधी सन्माननीय नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील यशाचा गौरव करण्यात आला.विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित व्हावी, तसेच ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने प्रगती करण्याचे आवाहन केले. खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून देगलूर शहराचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार यांनी स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे विविध उपक्रम सप्ताहभर राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात नगराध्यक्ष प्र. बालाजी टेकाळे यांच्यासह लक्ष्मीकांत पदमवार, देवेंद्र मोतेवार, मनोज तोटावर, नंदू शेठ शाखावार, मधुकर शेठ नारलावार, व्यंकट कांबळे, अनिल बोनलावर, दिगंबर कडलवार, सुमित कांबळे, खालिद पटेल, सय्यद सादत, अथर हाशमी, सय्यद इरफान, इद्रिस कुरेशी, संतोष उनग्रतवार आणि योगेश महिलागिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी योगेश महिलागिरे यांच्या सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याचाही गौरव करण्यात आला. देगलूर शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले योगेश महिलागिरे हे सक्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि जनसंपर्कात अग्रेसर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबविले असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि क्रीडानैपुण्य वाढावे यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. स्थानिक स्तरावर विविध क्रीडा स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याबरोबरच गरजू खेळाडूंना क्रीडा साहित्य व आर्थिक मदत मिळवून देण्यातही त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल अनेक संस्थांनी घेत त्यांचा गौरव केला आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Previous Post Next Post