वर्ध्यात देहव्यापारावर पोलिसांची मोठी कारवाई; पीडित महिलेची सुटका, दोन आरोपी अटकेत

वर्ध्यात देहव्यापारावर पोलिसांची मोठी कारवाई; पीडित महिलेची सुटका, दोन आरोपी अटकेत

 मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 

वर्धा पोलिसांच्या अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कक्ष (AHTU) आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संयुक्त कारवाई करत शहरातील सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, ₹34 हजार 500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना 4 जुलै 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कार्ला रोड परिसरातील वैष्णवी कॉम्प्लेक्स, नखाते लेआऊट येथे राहणारी रूपा दुर्योधन गावले ही आर्थिक फायद्यासाठी विविध राज्यांतील महिलांना बोलावून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री करण्यात आली. त्यानंतर AHTU व LCB च्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

कारवाईदरम्यान रूपा दुर्योधन गावले (वय 33) आणि तिचा साथीदार गणेश गोविंद महाले (वय 43) यांना ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान एका खोलीत पीडित महिला आणि बनावट ग्राहक आढळून आले. चौकशीत पीडित महिलेने ती नागपूर येथील रहिवासी असून, आरोपी महिलेने पैशांचे आमिष दाखवून तिला देहव्यापारात ढकलल्याचे सांगितले.

प्राथमिक तपासात आरोपी गणेश महाले हा ग्राहकांकडून पैसे घेणे आणि घराबाहेर लक्ष ठेवण्याचे काम करत असल्याचेही समोर आले. घटनास्थळावरून तीन अँड्रॉइड मोबाईल फोन, रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण ₹34 हजार 500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 143(2) तसेच अनैतिक देहव्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956 मधील कलम 3, 4, 5 आणि 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलेला संरक्षण व पुनर्वसनासाठी महिला सुधारगृह, वर्धा येथे पाठविण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU आणि LCB च्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
Previous Post Next Post