रावेर पोलिसांची मोठी कामगिरी!अजंदा रेल्वे पुलाजवळ ठेकेदाराला लुटणाऱ्या तिघांना २४ तासात बेड्या; मोटारसायकल, मोबाईलसह मुद्देमाल जप्त

 रावेर पोलिसांची मोठी कामगिरी!
अजंदा रेल्वे पुलाजवळ ठेकेदाराला लुटणाऱ्या तिघांना २४ तासात बेड्या; मोटारसायकल, मोबाईलसह मुद्देमाल जप्त

(महाराष्ट्र राज्य उपसंपादक  रावेर / शेख शरीफ )


रावेर तालुक्यातील अजंदा गावाजवळील रेल्वे पुल परिसरात बांधकाम ठेकेदाराला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे लुटणाऱ्या तिघा आरोपींना रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व मोबाईल जप्त करण्यात आला असून, आणखी काही लुटीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
रावेर पोलिस ठाण्यात दि. ५ जुलै २०२६ रोजी गुन्हा क्र. ३३४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३५१(२), (३) व (५) अन्वये रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी शेख जाबीर शेख अमान (वय ४१, रा. फारुकी आजम कॉलनी, चिनावल) हे बांधकाम ठेकेदार असून त्यांना मजुरांची आवश्यकता असल्याने त्यांचा विविध गावांमध्ये नियमित संपर्क असतो. या पार्श्वभूमीवर आरोपी शेख मुस्तकीम याने मजूर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादींना विवरा येथे बोलावले. त्यानंतर मजूर अजंदा येथे असल्याचे सांगून त्यांना अजंदा रेल्वे पुलाजवळ नेण्यात आले.
तेथे आधीच थांबलेल्या दोन साथीदारांसह फिर्यादींना शेतात नेऊन एका आरोपीने त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवत पैशांची मागणी केली. फिर्यादींकडील ५०० रुपये घेतल्यानंतर त्यांचा मोबाईल हिसकावून फोन-पेचा पिन जबरदस्तीने विचारून वेगवेगळ्या व्यवहारांतून ८ हजार रुपये दुसऱ्या खात्यावर वर्ग करण्यात आले. त्यानंतर आरोपी पसार झाले.
गुन्ह्याचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. रात्रीची वेळ असल्याने चेहरे स्पष्ट दिसत नसले तरी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपासाची दिशा मिळाली. त्यानुसार डीबी पथकाने कारवाई करून मुख्य आरोपी शेख मुस्तकीम शेख अकील (२२, फतेहनगर, रावेर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर शेख मोईन शेख नईम (१९, खिर्डी रोड, विवरा) व फैजल बेग हितायत बेग (१९, शंकर प्लॉट, रावेर) यांनाही अटक करण्यात आली.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली MH-19-ED-5580 क्रमांकाची मोटारसायकल व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपी शेख मोईन याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारच्या लुटीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता ९ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण आणि सुकेश तडवी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.
Previous Post Next Post