*बनावट सोन्याची नाणी देऊन 15 लाखांची फसवणूक; आरोपीकडून 80 हजारांची रोकड जप्त*

*बनावट सोन्याची नाणी देऊन 15 लाखांची फसवणूक; आरोपीकडून 80 हजारांची रोकड जप्त*

(पातुर अकोला तालुका प्रतिनिधी दूल्हे खान युसुफ खान)

पातूर : घरात सोन्याच्या नाण्यांनी भरलेला माठ सापडल्याचे सांगून 3 किलो 300 ग्रॅम बनावट सोन्याची नाणी देत एका व्यक्तीची 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पातूर पोलिसांनी एका आरोपीला वाशिम कारागृहातून ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून फसवणुकीच्या रकमेशी संबंधित 80 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 342/2026, कलम 318(4), 3(5) BNS अन्वये गुन्हा दाखल आहे. फिर्यादी युवराज कांबळे, रा. वडगणे, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचा आरोपींनी विश्वास संपादन केला. घरात सोन्याच्या नाण्यांचा माठ सापडला असून, नाणी विकायची असल्याचे सांगत प्रथम एक असली सोन्याचे नाणे दाखविण्यात आले. त्यानंतर अशाच प्रकारची सुमारे 3 किलो 300 ग्रॅम सोन्याची नाणी असल्याचे सांगण्यात आले.

यानंतर कांबळे यांना कोल्हापूरहून पातूर घाट परिसरातील नांदखेड फाटा येथे बोलावून घेण्यात आले. तेथे आरोपींनी 3 किलो 300 ग्रॅम वजनाची बनावट सोन्याची कॉईन देऊन त्यांच्या जवळून 15 लाख रुपये रोख घेतले आणि तेथून पसार झाले.

तपासादरम्यान आरोपी विनोद मच्छिंद्र चव्हाण, रा. डव्हा, ता. मालेगाव, जि. वाशिम हा अन्य एका गुन्ह्यात वाशिम कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयाची परवानगी घेऊन Production Warrant द्वारे त्याला वाशिम कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्यातील सहभागाची माहिती देतानाच मुख्य आरोपी नारायण सिताराम पवार, रा. आंत्रज, ता. खामगाव, जि. बुलढाणा तसेच अन्य एका व्यक्तीच्या सहभागाबाबत माहिती दिली.

तपासादरम्यान चव्हाण याच्याकडून फसवणुकीच्या रकमेशी संबंधित 80 हजार रुपये रोख पंचांसमक्ष जप्त करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि पातूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास गोसावी तसेच पोलीस अंमलदार दाऊद शेख, उमेश सांगळे, योगेश मुळवंडे व इस्माईल मुल्ला यांनी केली.

गुन्ह्याचा पुढील तपास पातूर पोलीस ठाण्याकडून सुरू असून, इतर आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
Previous Post Next Post