रागाने डोंगरावर गेलेल्या मुलाला वाचवताना वडिलांचा दरीत पडून मृत्यू; डोळ्यादेखत मुलगा, पतीचा मृत्यू झाल्याने आईचीही डोंगरावरून उडीतिसगावच्या खवड्या डोंगरावरील दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

रागाने डोंगरावर गेलेल्या मुलाला वाचवताना वडिलांचा दरीत पडून मृत्यू; डोळ्यादेखत मुलगा, पतीचा मृत्यू झाल्याने आईचीही डोंगरावरून उडी...

तिसगावच्या खवड्या डोंगरावरील दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू..

छत्रपती संभाजीनगर/प्रशांत बाफना: 

तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी (दि.21) घडलेल्या ह्रदयद्रावक घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डोगराच्या कड्यावर गेलेल्या 18 वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या वडिलांनचा दरीत पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर शोक अनावर झालेल्या आईनेही डोंगरावरून खाली उडी घेतल्याने तिचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुणाल मुरलीधर चांदवडे (वय 18), मुरलीधर चांदवडे आणि संगिता चांदवडे यांचा मृत्यू झाला. 


मिळालेल्या माहितीनुसार देवळाई (सातारा) परिसरातील कुणाल चांदवडे शुक्रवारी सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास तिसगाव येथील खवड्या डोंगरावर गेला होता. तो डोंगराच्या कड्यावर उभा राहिल्याचे समजल्यानंतर त्याचे आई- वडिल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवानही तेथे पोहोचले. 


कुणालला डोेंगरावरून खाली उडी मारू नये, यासाठी तब्बल तीन तास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो वारंवार आपली जागा बदलत होता आणि आईशी संवाद साधत होता. ग्रामस्थ तसेच पोलिस त्याला समजावत होते. मात्र, तो कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल जवळपास तीन तास डोंगराच्या कड्यावर होता. त्याला जीवन संपवू नये, आई- वडिलांचा विचार करावा, भविष्यातील संधीचा विचार करावा, अशी विनंती करण्यात आली. मात्र तो सतत नकार देत होता. 


तिसगाच्या सरपंचांनी सांगितले की, कुणाल वारंवार जागा बदलत होता. मात्र, तो आईशी बोलत होता. दुपारी एक वाजेपर्यंत त्याला समजावण्योच प्रयत्न सुरू होते. आम्ही कुणालला अनेकदा विनवणी केली, मात्र तो कोणचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सुरूवातीला त्याचे वडील डोंगराच्या खाली होते, तर आई वर उभी राहून त्याची समजूत काढत होती. घटनेच्या शेवटच्या 15 ते 20 मिनिटांत त्याचे वडीलही वर आले. ते कुणालला बोलण्यात गुतवून ठेवतील, असे आम्हाला वाटले. मात्र, वडील मुलाला पकडण्यासाठी आणि त्याच्यासह तेही खाली पडले. त्यांच्यापाठोपाठ आईनेही खाली उडी मारली, असे सरपंचांनी सांगितले. 


दरम्यान, मुलाला पकडून वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच कुणालने डोंगराच्या कड्यावरून स्वत:ला खाली झोकून दिले. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात मुरलीधर यांचाही तोल गेला आणि दोघेही दरीत कोसळले उंचावरून खाली पडल्याने दोघांचाही मृत्यू झाला. मुलगा आणि पती डोळ्यांदेखत दरीत कोसळल्याचे पाहून संगिता चांदवडे यांनाही मोठा धक्का बसला. त्यानंतर धावत जात त्यांनीही डोंगरावरून खाली उडी घेतली. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.अवघ्या काही क्षणांत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाल्याने घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ आणि बचाव पथकातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला. 


कुणालने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरगुती कारणावरून ही घडल्याचा अंदाज आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे तिसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
Previous Post Next Post