यावल तालुक्यातील चौथी शिष्यवृत्ती निकालावर संशय; तांत्रिक तपासणीसाठी पालकांची मागणी.
१२४ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या निकालातील तफावतीवरून खळबळ.
OMR शीट, सीसीटीव्ही आणि परीक्षेच्या व्यवस्थेची चौकशी करण्याची मागणी.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.२२
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या निकालावर यावल तालुक्यातून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. निकालाच्या सांख्यिकीय आकडेवारीत,गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या यादीत तसेच परीक्षेतील आसनक्रमांकाच्या स्वरूपात संशयास्पद तफावत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणाची तांत्रिक व निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील एकूण १५२ मान्यताप्राप्त शाळांमधील १ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण १२४ विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले आहेत. मात्र या निकालाच्या आकडेवारीचा सखोल अभ्यास केल्यानंतर काही गंभीर बाबी समोर आल्याचा दावा पालकांनी केला आहे. उर्दू माध्यमातील १२१ विद्यार्थी गुणवत्ताधारक
निकालातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे १२४ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपैकी तब्बल १२१ विद्यार्थी उर्दू माध्यमातील, तर केवळ ३ विद्यार्थी मराठी माध्यमातील असल्याचे निदर्शनास आले आहे.
म्हणजेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये उर्दू माध्यमाचा वाटा ९७.५८ टक्के, तर मराठी माध्यमाचा वाटा केवळ २.४२ टक्के आहे. यामुळे तालुक्यातील विविध शाळांमधील पालक आणि नागरिकांमध्ये निकालाच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून,ही तफावत केवळ योगायोग आहे की त्यामागे काही तांत्रिक कारण आहे, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.
माळोद आणि फैजपूर केंद्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक
यावल तालुक्यातील १२४ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपैकी १०३ विद्यार्थी म्हणजे ८३.०६ टक्के विद्यार्थी केवळ माळोद आणि फैजपूर या दोन परीक्षा केंद्रांशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामध्ये मालोद गाव क्लस्टरमधील ४० विद्यार्थ्यांसह फैजपूर शहर क्लस्टरमधील ६३ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गुणवत्ताधारक विद्यार्थी दोनच केंद्रांशी संबंधित असल्याने या केंद्रांवरील परीक्षेची प्रक्रिया आणि निकालाची तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे.
सलग आसनक्रमांक आणि समान टक्केवारीबाबत प्रश्न
पालकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये काही विद्यार्थ्यांचे आसनक्रमांक विशिष्ट क्रमाने सलग किंवा जवळपास सलग असल्याची बाबही नमूद करण्यात आली आहे. एकाच गटातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात ७५ ते ८५ टक्क्यांदरम्यान गुण मिळाल्याचेही सांगण्यात आले आहे.
तसेच काही विद्यार्थ्यांची नावे नॅशनल रूरल गुणवत्तायादीत एकाच पॅटर्नमध्ये आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.त्यामुळे हा प्रकार नैसर्गिक निकालाचा भाग आहे की त्यामागे काही तांत्रिक त्रुटी आहे, याची तपासणी होणे आवश्यक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
OMR शीट आणि CCTV फुटेजची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित केंद्रांतील विद्यार्थ्यांच्या OMR Sheets चे Pattern Analysis करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.विशेषतः केंद्र कोड ३३१३०३ अंतर्गत येणाऱ्या मालोद आणि फैजपूर परीक्षा केंद्रांतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रांवरील CCTV फुटेजची तातडीने तपासणी करून परीक्षा कालावधीत कोणतीही अनियमितता झाली का,याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेष चौकशी समितीची मागणी
परीक्षा केंद्रांवरील बैठक व्यवस्था,ड्युटी पॅटर्न, पर्यवेक्षकांची भूमिका तसेच केंद्रप्रमुखांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र विशेष चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत यावल तालुक्यातील अंतिम गुणवत्तायादीला स्थगिती देण्यात यावी. चौकशीत कोणताही गैरप्रकार किंवा तांत्रिक त्रुटी आढळून आल्यास निष्पक्ष वातावरणात पुनर्परीक्षा घेण्यात यावी किंवा गुणवत्तायादीचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न
या प्रकरणामुळे गुणवत्ताधारक तसेच गुणवत्तायादीबाहेर राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.निकाल प्रक्रियेबाबत निर्माण झालेला संशय दूर करण्यासाठी निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
पालकांच्या तक्रारीनुसार, हा प्रश्न केवळ काही विद्यार्थ्यांच्या निकालापुरता मर्यादित नसून शिष्यवृत्ती परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेवरील विश्वासाशी संबंधित आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन OMR शीट, CCTV फुटेज, आसनक्रमांकांचा पॅटर्न आणि परीक्षा केंद्रांच्या व्यवस्थेची तातडीने तांत्रिक चौकशी करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील चौथी शिष्यवृत्ती परीक्षा निकालातील कथित तांत्रिक तफावतीचे सत्य चौकशीनंतरच स्पष्ट होणार असल्याने,आता संबंधित यंत्रणा या गंभीर प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे पालकांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

