*निंभोरा बुद्रुकमधील गायी चोरीचा पर्दाफाश; चार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात*
गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण व CCTVच्या मदतीने निंभोरा पोलिसांची कारवाई
( जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे )
: रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथून दोन शेतकऱ्यांच्या वाड्यातून चार गायी चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा निंभोरा पोलिसांनी छडा लावला आहे. गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपींना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
दोन शेतकऱ्यांच्या वाड्यातून चार गायी चोरी
निंभोरा बुद्रुक येथील लक्ष्मण गोविंदा बोढे (वय ६५) आणि त्यांचे शेजारी सुपडू विश्वनाथ नेमाडे यांच्या वाड्यातून २९ जुलै २०२६ रोजी रात्री चोरट्यांनी चार गायी चोरून नेल्या होत्या. या गायींची एकूण किंमत सुमारे ६६ हजार रुपये होती. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात CCTNS गु.र.नं. १७२/२०२६, BNS कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
*वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन*
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित तसेच फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर यांनी तपास पथकाला आवश्यक सूचना देत मार्गदर्शन केले.
*तांत्रिक तपासातून आरोपी निष्पन्न*
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलिसांच्या पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या माध्यमातून तपासाची चक्रे फिरवली. या तपासातून चार संशयित आरोपी निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
१. हयात शेख मासून मन्यार (वय २५), रा. मन्यारवाडा, चिनावल, ता. रावेर.
२. शेख आवेश शेख एजाज खान (वय २०), रा. ख्वाजानगर, सावदा, ता. रावेर.
३. शेख राजीद शेख शरीफ (वय २३), रा. ईदगाहजवळ, रसलपूर, ता. रावेर.
४. शेख नासीर शेख चांद (वय ४५), रा. वरणगाव, ता. भुसावळ.
गुन्हे शोध पथकाची कामगिरी
ही यशस्वी कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोहेकॉ अविनाश पाटील आणि पोकॉ किरण कोळी यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे परिसरातील पशुधन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून, पोलिसांच्या तत्पर तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

