भारत विद्यालय न्हावी येथे तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न.
१८ शाळांतील १५० विद्यार्थ्यांचा सहभाग.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.२१
यावल तालुका विज्ञान अध्यापक मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भारत विद्यालय, न्हावी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी 'यावल तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा २०२६' मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमधील १८ नाट्यसंघांनी सहभाग नोंदवून सुमारे १५० बालवैज्ञानिकांनी वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित वैज्ञानिक नाटिकांचे प्रभावी सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ न्हावीचे अध्यक्ष शरददादा महाजन होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.उद्घाटक गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणांच्या माध्यमातून विज्ञान नाट्योत्सवाचे महत्त्व सोप्या भाषेत पटवून दिले.अध्यक्षीय भाषणात शरददादा महाजन यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून सर्जनशीलता व संशोधनवृत्ती वाढीस लावावी, असा मौलिक संदेश दिला. यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ.के.जी. पाटील,उपाध्यक्ष अनिलजी लढे, सेक्रेटरी जयंतदादा बेंडाळे, यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजीवजी बोठे, फैजपूर न.पा. शालेय समिती अध्यक्ष सिद्धेश्वर वाघुळदे, माजी मुख्याध्यापक संघ अध्यक्ष जयंत चौधरी,मुख्याध्यापिका सौ. संगीता फिरके यांच्यासह तालुक्यातील सर्व सन्माननीय केंद्रप्रमुख व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत रंगलेल्या या स्पर्धेसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता: मित्र,साधन की धोका?’, ‘इलेक्ट्रिक वाहने: पुढचा मार्ग’, ‘आंतरतारकीय अधिवास / अंतराळातील मानवी वस्ती’ आणि ‘महासागरांचे पुनरुज्जीवन’ हे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत परीक्षक म्हणून गणेश जावळे (पीएसएमएस स्कूल, बामणोद), श्रीमती वैशाली इंगळे (एल. एम. पाटील विद्यालय, राजोरे ) व सौ. किरण ठाकूर (प्रभात विद्यालय, हिंगोणे) यांनी चोख काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल:
प्रथम क्रमांक: एल. एम. पाटील विद्यालय, राजोरे (जिल्हास्तरासाठी निवड)
द्वितीय क्रमांक: स्व. दादा दयाराम देवराम सोनवणे माध्यमिक विद्यालय, दूसखेडा
तृतीय क्रमांक (विभागून): १) भारत विद्यालय, न्हावी व २) शशिकांत चौधरी माध्यमिक कन्या शाळा, यावल
उत्तेजनार्थ:१) शारदा विद्या मंदिर, साकळी व २) लोकविद्यालय,पाडळसे
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता फिरके,शिक्षण विभाग पं.स. व गटसाधन केंद्र यावल, मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ तसेच डॉ.नरेंद्र महाले (सरस्वती विद्या मंदिर, यावल), दिपक आमोदकर (भालोद),एस.एन.चौधरी (चुंचाळे), सचिन भंगाळे (डोंगरकठोरा),भुषण वाघुळदे (सांगवी),नितीन बारी (यावल), मुकेश तांबट (यावल), फैजान खान असलम खान (साकळी), एच.ए.पाटील,पी.व्ही.पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व विज्ञान शिक्षक,भारत विद्यालय न्हावी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.यशस्वी संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र महाले यांनी केले, तर आभार ज्ञानेश्वरी ठोंबरे यांनी मानले.

