कोपरगावातून पळवून नेलेल्या मुलीची नगरमध्ये सुटका, बोल्हेगावात घरात घुसून विवाहितेचा विनयभंग, गांजा ओढणाऱ्या तरुणाला पकडले..
क्राईम डायरी..
कोपरगावातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची नगरमध्ये सुटका..
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दरेवाडी परिसरातून दोन आरोपी ताब्यात..
(अहिल्यानगर विभागीय संपादक।प्रशांत बाफना)
कोपरगाव येथून पळवून नेण्यात आलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेत अहिल्यानगर शहरातील दरेवाडी परिसरातून तिची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी नूर राजू पठाण (वय 19, रा. आंबेडकरनगर, राहाता) आणि समीर मनोज सोनगत (वय 22, रा. हरीमळा, दरेवाडी, ता. अहिल्यानगर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी कोपरगाव येथील एक 12 वर्षीय मुलगी अज्ञात व्यक्तींनी पळवून नेली होती. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. पथकाने समांतर तपास सुरू केला.
दरम्यान, 21 ऑगस्ट रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मुलगी अहिल्यानगर शहरातील हरीमळा, दरेवाडी, सोलापूर रोड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने परिसरात जाऊन शोध घेतला. यावेळी मुलगी नूर राजू पठाण याच्यासोबत आढळून आली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान मुलगी आणि नूर पठाण हे कोपरगावहून अहिल्यानगरला आले असून, त्यांना कोपरगावातून येण्यासाठी समीर मनोज सोनगत याने मदत केल्याची माहिती समोर आली. तसेच दोघेही मागील दोन दिवसांपासून समीर सोनगत याच्याकडे राहत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी समीर सोनगत यालाही ताब्यात घेतले. सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीसह दोन्ही संशयितांना पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, फुरकान शेख, अशोक लिपणे, आजिनाथ पाखरे, रणजीत जाधव, अमृत आढाव, अभिजीत आरकल, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे आणि किरण ठुबे यांच्या पथकाने केली.
बोल्हेगावात घरात घुसून विवाहितेचा विनयभंग
अहिल्यानगर/प्रशांत बाफना : शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर येथे भरदिवसा घरात घुसून एका 25 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी समीर अखिल शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बोल्हेगाव येथील भीम चौकात पीडित महिला ही शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या घरात काम करत होती. त्यावेळी त्याच परिसरात राहणारा आरोपी समीर अखिल शेख हा तिच्या घरात शिरला. महिलेला काही समजण्याच्या आतच आरोपीने अयोग्य स्पर्श करून लज्जास्पद कृत्य केले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने विरोध करताच आरोपी तिथून पसार झाला. यानंतर पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली.
गांजा ओढणाऱ्या तरुणाला पकडले
अहिल्यानगर/प्रशांत बाफना : शहरातील बुरुडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉनशेजारील मोकळ्या जागेत चिलीमच्या साहाय्याने गांजा ओढणाऱ्या एका तरुणावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ऋषिकेश देविदास आनंदकर (वय 26, रा. श्रीरामनगर, बुरुडगाव रस्ता, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार सुरज दिलीप कदम यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. 21 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी ऋषिकेश आनंदकर हा बुरुडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉनच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात संशयास्पदरीत्या बसला होता. पोलीस पथक गस्तीवर असताना तो काळ्या रंगाच्या मातीच्या चिलीममधून गांजाचे सेवन करताना रंगेहात मिळून आला

