जायकवाडीचे पाणी पूर्वभागाला मिळण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट… हक्काच्या पाण्यासाठी निर्णायक पाऊल : पूर्व भागातील ३२ गावांचा एल्गार..

जायकवाडीचे पाणी पूर्वभागाला मिळण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट… 
हक्काच्या पाण्यासाठी निर्णायक पाऊल : पूर्व भागातील ३२ गावांचा एल्गार..

(अहिल्यानगर/ प्रशांत बाफना : विभागीय संपादक)

शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील ३२ गावांना हक्काचे पाणी अगोदर द्यावे व मगच दुसऱ्या तालुक्याचा विचार करावा. हे पाणी आमच्या हक्काचे असून पाणी घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. त्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांनी व युवकांनी हेही लक्षात घ्यावे की, संघर्ष केल्याशिवाय पाणी मिळणार नाही. त्यामूळे पक्षीय जोडे बाजूला ठेवून पाण्यासाठी एकत्र या असे प्रतिपादन सर्वपक्षीय पाणी परिषद कृती समितीचे अध्यक्ष, अॅड.शिवाजीराव काकडे यांनी बोधेगाव येथे केले.
आज दि.(०३) रोजी जायकवाडी जलाशयातून शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागाला हक्काचे पाणी मिळावे, तसेच परिसरातील तलाव, बंधारे, नालाबंडिंग व पाणलोट क्षेत्र या पाण्याने भरून मिळावे यासाठी पूर्व भागातील ३२ गावातील शेतकरी, युवक महिला व ग्रामस्थांची बोधेगाव येथे बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस माजी जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे, जगन्नाथ गावडे, रामनाथ घोरतळे, राम अंधारे, विश्वनाथ कुढेकर, भाऊसाहेब घोरतळे, भास्कर मासाळ, मिठू काजळे, भगवान बोडखे, राम पोटफोडे, अशोक ढाकणे, लक्ष्मण राठोड, अंबरनाथ बर्डे, माणिक गर्जे, शाहूराव खंडागळे, ज्ञानेश्वर रसाळ, शहादेव खेडकर, भाऊसाहेब सातपुते, सर्जेराव घोरपडे, आदिनाथ सुडके, सुनील गर्जे, विठ्ठल केदार, रामेश्वर पोटभरे, रामकिसन घनवट, भिमराव चेमटे, भागवत भोसले, नवनाथ खेडकर, राजू भांगरे, सुनिल गायके, प्रकाश गर्जे, रामनाथ भालेराव, अशोक पातकळ यांच्यासह युवक, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना अॅड.काकडे म्हणाले की, जायकवाडीच्या पाण्यातून ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.०१ व टप्पा क्र.०२ साठी सातत्याने संघर्ष केला. त्यासाठी मी कै.अजित पवार, शरद पवार, देवेद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांची मदत घेतली असून दुष्काळी भागातील शेतीला पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, केवळ आश्वासनांवर विसंबून न राहता हक्काचे पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवावा लागेल. "पाणी हाच धर्म आणि जात आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर जात-पात व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. पाणी कोणाच्या बापाचे नाही, ते आपल्या हक्काचे आहे," असा आपला निर्धार आहे. त्यामुळे आता बेफिकीर राहून चालणार नाही. या पाण्यासाठी गावागावांत बैठका घेऊन जनजागृती करावी लागणार असून हा बैठकीतून त्याचा शुभारंभ आहे. तुम्ही सर्वांनी साथ दिली तर पाणी दूर नाही. इतर तालुक्यातील पुढारी हे पाणी पळविण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनो आजच सावध व्हा व आपल्या पाण्याच्या मुद्द्यावर संघटीत व्हा. राजकीय विरोध, प्रशासनाची अनास्था आणि विविध अडचणींचा सामना करावा लागणार असून त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने समिती स्थापन करून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सौ.हर्षदा काकडे म्हणाल्या की, पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन एकत्र येणे आवश्यक आहे. ही केवळ एक बैठक नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी एकत्रितपणे उभे राहण्याची सुरुवात आहे. ताजनापूर टप्पा क्र.०२ योजना महिलांच्या मोठ्या सहभागामुळेच मंजूर झाली. त्यामुळे या लढ्यात देखील महिला व युवकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन लढा उभारावा. या प्रश्नासाठी या दुष्काळी ३२ गावातील महिला व युवकांच्या भेटी घेऊन याबाबत जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  
या बैठकीचे सूत्रसंचालन हरी फाटे, प्रास्ताविक अंबर बर्डे यांनी तर आभार माणिक गर्जे यांनी मानले.
// या ३२ गावांचा सहभाग : हातगाव, कांबी, बोधेगाव, बालमटाकळी, गायकवाड जळगाव, सुकळी, शेकटे बु,. शेकटे खु., बाडगव्हाण, मुरमी, शोभानगर, गोळेगाव, लमानतांडा, नागलवाडी, खडके, मडके, लाडजळगाव, सोनविहीर, ठाकूर पिंपळगाव, चेडे चांदगाव, बेलगाव, सुळे पिंपळगाव, पिंगेवाडी, अंतरवाली खु., कोनोशी, आधोडी, दिवटे, शिंगोरी, राणेगाव, मुंगी, खामपिंपरी, लखमापुरी.
 // तालुक्याच्या पूर्व भागातील ३२ गावांसाठी पाणी मिळावे यासाठी आजपर्यंत कोणत्याही सत्ता भोगलेल्या पुढाऱ्यांनी एक ब्र शब्द देखील काढला नाही. या तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी गावांना अॅड.शिवाजीराव काकडे साहेब फक्त आणि फक्त तुम्हीच पाणी देऊ शकता त्यामुळे सर्व युवक, शेतकरी व महिलांना तुमच्या पाठीशी उभा करू. :- श्री.माणिक गर्जे, ग्रा.प.सदस्य, बोधेगाव
Previous Post Next Post