नायगाव येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि. ५
— शिक्षक दिनाचे औचित्य साधून नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींचा सत्कार करण्यात आला. यावल-रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप दिव्यांग आघाडी जिल्हा (पूर्व) अध्यक्ष अरुण पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा श्रीफळ, गुलाबपुष्प व रुमाल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अरुण पाटील यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, शिक्षक केवळ ज्ञान देण्याचे काम करीत नाहीत, तर विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त, यशाचा मार्ग आणि उज्ज्वल भविष्याबरोबरच जीवन जगण्याची दिशाही दाखवतात. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे मार्गदर्शन स्वीकारून ते आचरणात आणणे गरजेचे आहे. तसेच पालकांनीही आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे आणि संस्कारांकडे विशेष लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवडणूक कामकाजातील योगदानाचेही कौतुक
मागील महिन्यात शिक्षक बीएलओंना निवडणूक याद्यांसंदर्भात SIR याद्या संकलित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. नियमित शालेय कामकाज सांभाळून शिक्षकांनी हे काम सुरळीत, पारदर्शक व जबाबदारीने पार पाडल्याबद्दल आमदार अमोल जावळे यांनी बीएलओ, बूथप्रमुख, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या योगदानाचे कौतुक करून आभार व्यक्त केले होते.
दरम्यान, ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत मतदार यादी संदर्भातील पुढील टप्प्यात नवीन मतदारांची नोंदणी, डिलीट झालेल्या मतदारांशी संपर्क तसेच चुकीच्या नोंदींबाबत हरकती दाखल करणे व त्यावर कार्यवाही यासारखी कामे होणार आहेत. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथप्रमुखांनी बूथवर जाऊन नागरिकांशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार अमोलदादा जावळे यांनी केले आहे.
याच पार्श्वभूमीवर नायगाव भाजप शक्तिकेंद्र प्रमुख अरुण पाटील यांनी शिक्षक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरफराज तडवी, ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव सपकाळे, भाजप बूथप्रमुख सुधीर पाटील यांच्यासह ग्रेडेड मुख्याध्यापक निवृत्ती भिरुड, शिक्षक भरत सिरसाठ, मालसिंग भुगवाडे, किशोर पाटील, मधुकर मगरे, भटराज सिरसाठ, शिक्षिका भारती पाटील, नजीमा तडवी, ललिता माळी यांच्यासह शाळेतील संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या शेवटी सुरेश खुणे-पिंपरे सर यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

