पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर शासन करा..
खा. संजय राऊत यांच्याकडे देगलूर पत्रकार संरक्षण समितीचे निवेदन..
(माहेमूद पिंजारी
तालुका प्रतिनिधी देगलूर)
देगलूर, दि. १० सप्टेंबर २०२६ : दरम्यान, सामना वृत्तपत्राचे संपादक तथा खासदार संजय राऊत हे हैदराबादहून नांदेड दौऱ्यावर जात असताना देगलूर येथील विश्रामगृहात दाखल झाले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
महाराष्ट्रातील पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांना, धमक्यांना व दबावाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर कायदेशीर उपाययोजना कराव्यात, तसेच पत्रकारांना प्रभावी संरक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी देगलूर टाइम्स व देगलूर पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सामना वृत्तपत्राचे संपादक तथा खासदार संजय राऊत यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील पत्रकार हे जनतेवरील अन्याय, भ्रष्टाचार, गैरप्रकार तसेच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असतात. अनेकदा प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या विरोधात जाऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडताना पत्रकारांना विविध प्रकारच्या दबावाला सामोरे जावे लागते. काही ठिकाणी पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे, मानसिक त्रास देणे, कामात अडथळे निर्माण करणे तसेच थेट हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
यापुढे पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले किंवा धमकीचे प्रकार घडू नयेत, यासाठी दोषींवर कठोर शासन होण्यासाठी शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांच्याकडे करण्यात आली. तसेच पत्रकारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पत्रकारांचा विमा काढण्यात यावा, पत्रकारांना शासकीय समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्यात यावे आणि पत्रकारांना त्यांच्या कर्तव्याचे निर्भयपणे पालन करता यावे, यासाठी ठोस संरक्षणात्मक यंत्रणा उभारण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता समाजासमोर सत्य मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले हे केवळ एका व्यक्तीवरील हल्ले नसून लोकशाहीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे आघात आहेत. पत्रकारांना सुरक्षित वातावरण मिळणे ही शासनाची जबाबदारी असून यासाठी आवश्यक ती कठोर पावले उचलावीत, अशी भूमिका समितीच्या वतीने मांडण्यात आली.
याच भेटीदरम्यान पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा देगलूर टाइम्सचे संपादक गजानन टेकाळे आणि सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार धनाजी जोशी यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबतचे निवेदन सादर केले. पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्यावर सकारात्मक कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

