लाचखोर उप अधीक्षक भूमि अभिलेख सुरेश वेताळ यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास!
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय;
४ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शिक्षा
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.७
शेताच्या नकाशातील चुकीची नोंद दुरुस्त करून मूळ प्रकरण पुढील कारवाईसाठी पाठवण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी तत्कालीन उप अधीक्षक भूमि अभिलेख, वर्ग २ (देवळा) सुरेश पर्वत वेताळ यांना नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना ३ वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
मौजे चिंचवे येथील तक्रारदार शेतकऱ्याच्या जमिनीच्या नकाशामध्ये चुकीची नोंद झाली होती. ती दुरुस्त करण्यासाठी सुरेश वेताळ यांनी सुरुवातीला ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ४ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) नाशिक यांच्याकडे तक्रार नोंदवली.
३० मार्च २०१२ रोजी देवळा येथील भूमी अभिलेख कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वेताळ यांना रंगेहात पकडले होते. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाचा निकाल:
सदर खटल्याची सुनावणी नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. व्ही. कथाऱ्ये यांच्यासमोर झाली. सर्व पुरावे व साक्ष तपासून न्यायालयाने आरोपी सुरेश वेताळ यांना दोषी ठरवत खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ नुसार: २ वर्षे कारावास व ₹२,००० दंड (दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास).
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम १३ (२) नुसार: ३ वर्षे कारावास व ₹३,००० दंड (दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास).
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री. विजय गायकवाड व श्री. शिरीष कडवे यांनी काम पाहिले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन:
कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा.
टोल फ्री क्रमांक: १०६४
नाशिक कार्यालय: ०२५३-२५७५६२८ / २५७८२३०
जळगाव कार्यालय: ०२५७-२२३५४७७
व्हॉट्सॲप क्रमांक: ९५४५६५१०६४

