तांडा परिसरातील कथित हातभट्टीवर कारवाईची मागणी
जंगल परिसरात विशेष शोधमोहीम राबविण्याची रूपेश मांढरे यांची मागणी
(महेश निमसटकर
जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर)
भद्रावती, दि.०५: भद्रावती तालुक्यातील तांडा गाव व लगतच्या जंगल परिसरात कथित हातभट्टी दारूची निर्मिती होत असल्याच्या माहितीनंतर समाजसेवक तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा सचिव रूपेश मांढरे यांनी पोलिसांकडे निवेदन सादर करून तातडीने विशेष हातभट्टीविरोधी शोधमोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
तांडा गावासह गावालगतच्या दुर्गम जंगल परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून कथित हातभट्टी निर्मितीची ठिकाणे शोधावीत. दारूची निर्मिती, साठवणूक, वाहतूक व विक्रीची संपूर्ण साखळी तपासून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कथित हातभट्टी दारू भद्रावती शहरातील काही भागांत पोहोचत असल्याची माहिती असल्याने तांडा ते भद्रावती मार्गावर विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्याची मागणीही मांढरे यांनी केली आहे. तसेच पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे हातभट्टीविरोधी कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
“मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता मिळालेल्या माहितीची तातडीने पडताळणी करून प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे आहे,” अशी भूमिका रूपेश मांढरे यांनी मांडली.
हे निवेदन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्याकडे सादर करण्यात आले असून, त्याच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी, चंद्रपूर तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

