कचरा संकलन की रस्त्यावर कचरा फैलावण्याचे काम?यावलमध्ये ठेकेदाराच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; सत्ताधारी-विरोधक नगरसेवकांचेही दुर्लक्ष ?

कचरा संकलन की रस्त्यावर कचरा फैलावण्याचे काम?
यावलमध्ये ठेकेदाराच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; सत्ताधारी-विरोधक नगरसेवकांचेही दुर्लक्ष ?

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल, दि.४ 
यावल शहरातील कचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे.कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनातूनच रस्त्यावर कचरा पडत असल्याचे छायाचित्रात दिसत असून, त्यामुळे कचरा गोळा केला जात आहे की रस्त्याने तो फैलावला जात आहे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कचरा संकलनाचे काम संबंधित ठेकेदाराकडे असताना वाहनातून कचरा रस्त्यावर पडत असतानाही ठेकेदार अथवा त्यांचा मुकादम माऊली यांचे याकडे लक्ष नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. कचरा वाहतूक करताना तो रस्त्यावर पडणार नाही, परिसरात दुर्गंधी पसरणार नाही आणि नागरिकांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
नगरसेवकांची भूमिका काय?
विशेष म्हणजे शहरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविण्याची जबाबदारी असलेल्या सत्ताधारी तसेच विरोधी गटातील काही नगरसेवकांनी या प्रकाराकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर कचरा पडत असतानाही संबंधितांकडून पाहणी किंवा जाब विचारला जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
बिल नेमके कोणते काम पाहून दिले जाते?
कचरा संकलन व वाहतुकीच्या कामासाठी ठेकेदाराला नगरपरिषदेकडून बिल अदा केले जाते. मात्र बिल अदा करताना प्रत्यक्षात कोणत्या निकषांची, कोणत्या कामाची आणि कोणत्या तपासणीची पूर्तता केली जाते? हा महत्त्वाचा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कचरा संकलनाचे काम समाधानकारक झाले आहे की नाही, वाहनांची स्थिती, कचऱ्याची वाहतूक योग्य पद्धतीने होत आहे की नाही, तसेच रस्त्यावर कचरा पडल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाते का, याची नगरपरिषद प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.
“नागरिकांच्या करातून ठेकेदाराचे बिल दिले जाते; मग नागरिकांना स्वच्छतेऐवजी रस्त्यावर कचरा मिळत असेल तर जबाबदारी निश्चित होणार कधी?” असा सवाल आता यावलकरांकडून उपस्थित केला जात आहे.
Previous Post Next Post