जिल्हा सहकारी बँक निवडणूक; श्रीगोंद्यात कुणाची फिल्डिंग ठरणार भारी?
(प्रशांत बाफना। अहिल्यानगर विभागीय संपादक)
ः अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीची अधिकृत रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच विविध गटांकडून मोर्चेबांधणी आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार विक्रमसिंह पाचपुते, श्रीगोंदा साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप आणि जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी आपापल्या पातळीवर तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. विशेषतः सहकार क्षेत्रातील मतदारांशी संपर्क वाढविण्यावर संबंधित गटांचा भर असल्याचे दिसून येत आहे.
माजी आमदार राहुल जगताप यांची राजकीय कोंडी करण्यासाठी राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून राजेंद्र नागवडे आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे एकत्र झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी या संभाव्य समीकरणामुळे श्रीगोंद्याच्या सहकार राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, राहुल जगताप यांना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा पाठिंबा असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे एका बाजूला पाचपुते-नागवडे गटाची संभाव्य आघाडी आणि दुसऱ्या बाजूला जगताप यांना मिळणारा संभाव्य पाठिंबा, अशी राजकीय रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे हेही पडद्यामागून शांतपणे हालचाली करत असून अर्चना पानसरे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढत असताना मतांची विभागणी आणि त्यातून निर्माण होणारी नवी समीकरणे निर्णायक ठरू शकतात.
विशेष म्हणजे श्रीगोंदा सहकारी संस्था मतदारसंघातून माजी आमदार राहुल जगताप विरुद्ध प्रतापसिंह पाचपुते अशी थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही लढत प्रत्यक्षात आली तर ती केवळ दोन उमेदवारांमधील निवडणूक न राहता श्रीगोंद्याच्या सहकार क्षेत्रातील दोन राजकीय प्रवाहांची ताकद आजमावणारी ठरण्याची शक्यता आहे.
या सर्व राजकीय समीकरणांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचा प्रभाव पडू शकतो, अशीही चर्चा आहे. त्यामुळे अंतिम क्षणी कोण कोणाच्या सोबत जाते, कोणत्या गटाची कोणाशी हातमिळवणी होते आणि कोणता उमेदवार माघार घेतो, यावर निवडणुकीचे चित्र बरेचसे स्पष्ट होणार आहे.
इच्छुकांची वाढती संख्या, पडद्यामागील बैठकांचा वाढता सिलसिला आणि संभाव्य राजकीय एकत्रपणा यामुळे श्रीगोंदा जिल्हा बँक निवडणुकीची रंगत आतापासूनच वाढली आहे. अखेरच्या टप्प्यात कोणाची फिल्डिंग भारी ठरते आणि जिल्हा बँकेत अखेर बाजी कोण मारतो, याकडे संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागले आहे

