धुरांच्या रेषा हवेत न काढी..."
प्रशांत बाफना 8055440385
गेल्याच महिन्यात ' एलएनजी ' वर चालणारी भारताची पहिली रेल्वेगाडी गुजरातमधील साबरमती रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात आली. 'एलएनजी ' म्हणजे अतिशय कमी तापमानाला थंड केलेला द्रवरूप नैसर्गिक वायू.या वायूमध्ये मिथेन हा मुख्य घटक असतो. वायूचे द्रवामध्ये रूपांतर केल्यामुळे साठवण आणि वाहतूक सुलभ होते.आठ डबे असलेली ही डेमू रेल्वेगाडी डिझेल आणि एलएनजी अशा दोन्ही इंधनांचा एकत्रितरीत्या वापर करते.या तंत्रज्ञानामुळे डिझेलचा वापर सुमारे ४० टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे.डिझेलच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साइडबरोबरच काजळी,सूक्ष्म कण आणि नायट्रोजन ऑक्साइड यांसारखी प्रदूषके निर्माण होतात.पण एलएनजीसारख्या नैसर्गिक वायूच्या ज्वलनामुळे काजळी आणि सूक्ष्म कणांचे उत्सर्जन होत नाही. परिणामी रेल्वेमार्गालगतच्या हवेत प्रदूषण कमी प्रमाणात होणार आहे. इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणार्या धुरामुळे आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे विघातक परिणाम लक्षात घेऊनच, वाहतूक व्यवस्था अधिकाधिक पर्यावरणस्नेही करण्यासाठी ही एलएनजी वर चालणारी रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे वाहतुकीतील डिझेलचा वापर कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.गेल्या दहा ते बारा वर्षांच्या काळात सुमारे ६८ टक्के रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. २०१५-१६ मध्ये भारतीय रेल्वे २९३ कोटी लिटर डिझेल वर्षभरात वापरत होती. यामध्ये आता मोठी घट झाली आहे.सध्या रेल्वे वर्षभरात १०८ कोटी लिटर डिझेल वापरते. एलएनजी आणि डिझेल ही द्विइंधन प्रणाली वापरणार्या डेमू गाडीमध्ये पारंपारिक डिझेल इंजिन पूर्णपणे बदलून नवीन इंजिन बसवण्यात आलेले नसून विद्यमान १,४०० अश्वशक्ती क्षमतेच्या इंजिनमध्ये एलएनजी वापरण्याची व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. इंजिनमधून नैसर्गिक वायूची गळती होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर या गाडीमध्ये इलेक्ट्राॅनिक इंधन नियंत्रण प्रणाली बसवण्यात आली आहे.या निर्मितीमध्ये चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) आणि संबंधित रेल्वे यंत्रणांचा सहभाग आहे.
जुलै महिन्यात हरियाणातील जिंद जंक्शन ते सोनीपत या सुमारे ८९ किलोमीटरच्या मार्गावर हायड्रोजनवर चालणारी,पूर्ण भारतीय बनावटीची रेल्वेगाडी सुरू करण्यात आली. हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन यांच्या रासायनिक अभिक्रियेतून तयार झालेल्या विद्युत ऊर्जेवर ही गाडी चालते.इंधन-
विद्युतघटाबरोबरच गाडीमध्ये लिथियम आयर्न फाॅस्फेट बॅटरी बसविण्यात आली आहे.गाडीच्या संचालनाच्या ठिकाणी डिझेल इंजिनाप्रमाणे धूर किंवा कार्बन डायऑक्साइड बाहेर पडत नाही;तर या प्रक्रियेत पाण्याची वाफ बाहेर टाकली जाते.या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ रेल्वेगाडीच नव्हे,तर हायड्रोजनची निर्मिती, साठवण,दाब वाढवणे, गाडीमध्ये इंधन भरणे आणि सुरक्षित संचालन यांसाठी आवश्यक असलेली संपूर्ण यंत्रणा भारतीय रेल्वेने विकसित केली आहे.हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील वायू असल्यामुळे या रेल्वे प्रकल्पात हायड्रोजन गळती शोधणारे संवेदक, तापमान आणि आग ओळखणारी यंत्रणा, स्वयंचलित नियंत्रण व्यवस्था आणि सुरक्षित इंधन भरण्याची सुविधा यांचा समावेश आहे.
रेल्वे वाहतुकीबरोबरच रस्ते वाहतुकीमध्येदेखील पेट्रोल,डिझेलसारख्या जीवाश्म इंधनांचा वापर कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर केला जात आहे.इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला व निर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे.त्याच बरोबर पेट्रोलमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात इथेनाॅल मिसळून पेट्रोलचा वापर कमी करता येतो.सध्या ई-२० प्रकारचे पेट्रोल वापरले जाते.अशा वाहनांना 'फ्लेक्स- फ्युएल 'वाहने म्हणतात.कारण त्यांची इंजिने पेट्रोल आणि इथेनाॅलच्या वेगवेगळ्या मिश्रणांनुसार स्वतःच्या कार्यपद्धतीत बदल करू शकतात. अमेरिका आणि स्वीडनमध्ये ८५ टक्के इथेनाॅल (ई८५)मिश्रित इंधनावर चालणार्या फ्लेक्स-फ्युएल मोटारी आहेत.भारतातही १०० टक्के इथेनाॅलवर चालणार्या मोटारी बाजारात आणण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.अर्थात,इंधनाची उपलब्धता,वाहनांच्या किंमती आणि ग्राहकांच्या प्रत्यक्ष अनुभवावर या वाहनांचा वापर अवलंबून असेल.मात्र, देशातील वाहतूक व्यवस्था पर्यावरणपूरक आणि शाश्वत बनविण्यासाठी पेट्रोल व डिझेलवरील अवलंबित्व कमी करून पर्यायी इंधनांच्या वापराला प्रोत्साहन देणे ही आता काळाची गरज आहे

