संगमनेर-राहात्यातील सुचकाने इन्कार केला अन्…; सुजय विखे-रणजीत देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा झाला!..
(अहिल्यानगर | प्रशांत बाफना विभागीय संपादक महाराष्ट्र राज्य)
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची आज छाननी झाली. या छाननीमध्ये संगमनेर सोसायटी मतदारसंघातून रणजीतसिंह विजयसिंह देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चित्रा गायकवाड यांच्या सुचकाने आपली सही बनावट असल्याचे आणि मी ती सहीच केली नसल्याचा जबाब इनकॅमेरा नोंदवला. असाच प्रकार राहाता सोसायटी मतदारसंघात सुजय विखे पाटील यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केलेल्या चंद्रभान घोगरे यांच्या सुचकाच्या बाबत झाला. घोगरे यांच्या सुचकाने देखील इनकॅमेरा जबाब नोंदवत ती सही आपली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या संगमनेरमधून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे जावई देशमुख आणि राहतामधून डॉ. सुजय विखे पाटील यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. जिल्हा बँक निवडणुकीत दाखल उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्यासमोर आज पार पडली. सोसायटी मतदारसंघ निहाय छाननी झाली. यावेळी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी तसेच कायदेसल्लागार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शह-प्रतिशहाच्या खेळीत सुचकांच्या भूमिका!
राहता आणि संगमनेर हे विखे-थोरात या दोघांचे बालेकिल्ले! राहता विखेंचा बालेकिल्ला! तिथे थोरात समर्थक घोगरे यांचा अर्ज आल्याने तेथे विखेंना थेट आव्हान दिसून आले. संगमनेर थोरातांचा बालेकिल्ला! तिथे विखे समर्थक आ. खताळ-आ. लंघे यांनी जाऊन चित्रा गायकवाड यांचा अर्ज भरला. हे थोरातांना थेट आव्हानच होते! उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या काही मिनिटांत हे सारे झाले! शेवटच्या मिनिटात थोरातांनी विखेंना शह दिला असल्याची चर्चा असतानाच विखेंनी देखील लागलीच संगमनेरमध्ये खेळी खेळली अशी चर्चा रंगली होती. छाननीमध्ये दोघांच्याही उमेदवारांनी इन कॅमेरा जबाब नोंदवला आणि सुचक म्हणून आपली सहीच नसल्याचा जबाब लिहून दिला. हे सारे वरकरणी दिसते इतके सहज घडले असेल का? नक्कीच नाही!
नाहाटा-पाचपुते यांचे अर्ज बाद!
श्रीगोंदा सोसायटी मतदारसंघातून बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांचा अर्ज आला होता. मात्र, त्या अर्जासोबत सोसायटीचे ताळेबंद आणि लेखा परीक्षण अहवालाची पूर्ण कागदपत्रे नव्हती. ती दाखल करण्याची मुदत देण्यात आली. मात्र, सदरची सोसायटी क वर्गात असल्याचे समोर आल्याने नाहाटा यांचा अर्ज बाद झाला. ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांनी ज्या सोसायटीचा ठराव घेऊन उमेदवारी दाखल केली होती, ती सोसायटी देखील क वर्गात असल्याने त्यांचा अर्ज देखील बाद करण्यात आला.
सुजय विखे यांच्या विरोधात राहुरी
कारखान्याच्या थकबाकीचा आक्षेप फेटाळला!
राहुरी कारखान्याकडे जिल्हा बँकेची कर्ज थकबाकी आहे. संचालक मंडळाला बँकेने वैयक्तिक कर्ज दिले होते आणि त्यामुळेच सुजय विखे हे निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याचा आक्षेप त्यांच्या विरोधकांनी अॅड. सुरेश लगड यांच्या मार्फत नोंदवला. सुजय विखे हे राहुरी कारखान्याचे स्वीकृत संचालक असल्याने त्यांना या थकबाकीसाठी जबाबदार धरण्यात यावे आणि त्यास्तव त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात यावा असा आक्षेप नोंदविण्यात आला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा आक्षेप फेटाळण्यात आला.
राम शिंदे यांच्या तडाख्यात राळेभात राजवट समाप्त!
जामखेड सोसायटी मतदारसंघात जगन्नाथ राळेभात यांनी अनेक वर्षे जिल्हा बँकेत प्रतिनिधीत्व केेले. यावेळी देखील त्यांचे चिरंजीव अमोल आणि सुधीर या दोघांनी अर्ज दाखल केले होते. याशिवाय राम शिंदे यांच्याकडून सचिन घुमरे यांचा अर्ज दाखल आहे. हे तीनही अर्ज वैध झाले आहेत. मात्र, या मतदारसंघातील तीसपेक्षा जास्त ठरावांचे प्रतिनिधी राम शिंदे यांनी सहलीवर पाठवले आहेत. राळेभात बंधूंना राम शिंदे सहकार्य करण्याच्या मनस्थितीत नाहीत! त्यामुळे या तालुक्यातील जिल्हा बँकेच्या निमित्ताने राळेभात यांची राजवट संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सचिन घुमरे या सामान्य कार्यकर्त्याला राम शिंदे यांची पसंती मिळू शकते.
कोपरगावमध्ये काळे-कोल्हे यांची युती!
कोपरगावमध्ये काळे-कोल्हे यांच्यात विस्तव जात नसला तरी जिल्हा बँकेच्या निमित्ताने दोघांनीही सहमती एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. शेतीपुरक मतदारसंघातून आ. आशुतोष काळे आणि सोसायटी मतदारसंघातून आ. विवेक कोल्हे यांची उमेदवारी आली आहे. या दोघांनीही थोरात-विखे समर्थक पॅनलमधून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.
शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले यांनी एकहाती गड राखला!
जिल्हा बँक निवडणुकी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उड्या पडत असताना माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेवासा तालुक्यातून त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नाही. तसेच शेवगावमधून घुले पाटलांच्या विरोधात एकही अर्ज आला नाही. घुले दांपत्याचे दोन्ही अर्ज मंजूर झाले. आता येथून राजश्री घुले यांचा अर्ज मागे घेतला जाऊन चंद्रशेखर घुले यांचा एकमेव अर्ज राहील. म्हणजेच गडाख आणि घुले हे दोन्ही व्याही जिल्हा बँकेत बिनविरोध आलेले दिसतील.
चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर, अंबादास पिसाळ मैदानात!
दहा वर्षेपेक्षा जास्त संचालक राहिल्याने बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर आणि अंबादास पिसाळ हे मैदानातून बाहेर पडतील म्हणजेच त्यांचे अर्ज बाद होतील असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. या तिघांचेही त्य त्या तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून दाखल अर्ज वैध ठरवण्यात आले.
अर्जांची छानणी, हरतींची सुनावणी सुरु…निकाल बुधवारी…
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ३५० पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांची मंगळवारी छाणणी झाली. यात काही अर्ज अवैध ठरले आहेत. तर काही अर्जांवर विरोधकांनी हरकती नोंदवल्या आहेत. उशिरापर्यंत हरतींवर सुनावणी सुरु होती. हरकतींच्या सुनावणीनंतर बुधवारी दुपारी ११ वाजता हरकतींच्या निकालासह जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आणि किती जणांचे अर्ज अवैध ठरले हे सांगितले जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सांगितले

