७/१२ उताऱ्यावर बोअरवेलच्या नोंदीसाठी लाच मागणारा आमोद्याचा तलाठी रंगेहाथ जाळ्यात.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.६ ऑक्टोबर
शेतात बसवलेल्या सोलर सिस्टीमसाठी ७/१२ उताऱ्यावर कुपनलिका (बोअरवेल) नोंदवून उतारा देण्यासाठी लाच मागणार्या तलाठ्याला १,००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले.शैलेश अंकुश झोटे ( वय ३८, रा. रावेर, जि. जळगाव; मूळ रा. मेहेकर, जि. बुलढाणा ) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून, तो आमोदा (ता. यावल) येथे महसूल विभाग (वर्ग-३) मध्ये तलाठी म्हणून कार्यरत आहे.
काय आहे प्रकरण?
आमोदा येथील एका ३६ वर्षीय शेतकर्याने आपल्या शेतात सिंचनासाठी कुपनलिका (बोअरवेल) केली आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत सोलर सिस्टीम बसवण्यासाठी शेतीच्या ७/१२ उताऱ्यावर बोअरवेलची नोंद असणे आवश्यक होते. यासाठी तक्रारदार शेतकरी तलाठी शैलेश झोटे यांच्याकडे गेले असता, त्यांनी नोंद घेवून उतारा देण्यासाठी ४,००० रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ३,५०० रुपये शेतकर्याने नाईलाजास्तव रोख स्वरूपात दिले होते.
त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी शेतकरी कामाच्या पाठपुराव्यासाठी गेले असता, तलाठी झोटे याने उर्वरित ५०० रुपये आणि नोंदीचा उतारा देण्यासाठी अतिरिक्त ५०० रुपये, अशी एकूण १,००० रुपयांच्या लाचेची मागणी पुन्हा केली. याप्रकरणी वैतागलेल्या शेतकर्याने ६ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (जळगाव) कडे तक्रार नोंदवली.
पंचामक्ष सापळा रचून कारवाई
तक्रारीच्या अनुषंगाने ६ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय, आमोदा येथे पंचांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान तलाठी शैलेश झोटे याने पूर्वी ३,५०० रुपये स्वीकारल्याचे मान्य केले आणि उर्वरित १,००० रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली.
त्यानुसार लागलीच रचलेल्या सापळ्यात आरोपी तलाठी शैलेश झोटे याला १,००० रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सुनील वानखेडे, पोकॉ प्रणेश ठाकूर व पोकॉ मनोज पाटील यांच्या पथकाने केली. या कारवाईस नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेराळे व श्रीमती कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन:
कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव (दूरध्वनी: ०२५७-२२३५४७७, व्हॉट्सॲप: ७५८८६६१०६४) किंवा टोल-फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.

