*नांदुरीत काळी-पिवळी जीपचालकांची मनमानी? सप्तशृंगीगडाकडे जाणाऱ्या भाविकांकडून अवाजवी भाडेवसुलीचा आरोप*
जळगाव जिल्हा :प्रतिनिधी जितु इंगळे
सप्तशृंगीगडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक व पर्यटकांना नांदुरी येथून प्रवास करताना काळी-पिवळी जीपचालकांकडून कथितरीत्या अवाजवी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांकडून अवघ्या दहा किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्बल १०० रुपये भाडे आकारले जात असल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे.
सप्तशृंगीगड हे राज्यातील महत्त्वाचे धार्मिक पर्यटनस्थळ असून, दररोज मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. नांदुरी येथून गडाकडे जाण्यासाठी स्थानिक वाहतुकीवर भाविकांना अवलंबून राहावे लागते. मात्र, गर्दीच्या काळात प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, काही जीप चालक व मालकांकडून "पोलीस प्रशासनाच्या माहितीतच ही भाडेवसुली सुरू आहे", असा दावा केला जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची वाहतूक विभाग व पोलीस प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
प्रवाशांकडून ठरावीक दरापेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच नांदुरी ते सप्तशृंगीगड मार्गावरील प्रवासी वाहतुकीचे दर स्पष्टपणे दर्शविणारे फलक लावावेत, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
भाविकांची गैरसोय आणि आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अधिकृत भाडेदर निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

