बिट मार्शलच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला; फॅक्टरीतील कामगारच निघाले चोर...दोन लाख 15 हजार पैकी एक लाख 70 हजार रुपये जप्त.... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : शहादा- प्रकाशा रस्त्यावरील शिरुड चौफुली येथील सूर्या फॅक्टरीमधील कामगार रोख रक्कम चोरुन नेत असताना रात्रीच्या गस्तीवर असलेल्या बीट मार्शल यांनी रंगेहात पकडले. संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून एका मोटरसायकल व सुमारे एक लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेने चोरीचा हा प्रयत्न फसला. 28 जुलैच्या मध्यरात्री सुमारे अडीच वाजेच्या सुमारास शहादा पोलीस ठाण्यातील बीट मार्शल मिथुन शिसोदे व अमृत पाटील शहादा शहारात शासकीय दुचाकीवरुन रात्र गस्त करीत असतांना शहरातील गाडगेबाबा आश्रम येथे पोहोचले. यादरम्यान, एका मोटरसायकलीवरुन 3 जण पांढऱ्या रंगाच्या गोण्या संशयास्पदरित्या नेत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वेगाने दुचाकी नेत गुजर भवनाकडे जात असतांना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन गुजर भवनच्या पाठीमागे, शहादा येथे पकडले. यादरम्यान सहायक फौजदार प्रदीप राजपुत, विकास शिरसाठ यांचेशी संपर्क साधून बोलावुन घेत त्यांच्या मदतीने पकडलेल्या तिघांना पोलीस ठाण्यात आणले. पांढऱ्या गोण्यांची तपासणी केली असता तीत एक लाख 70 हजार रुपयांची नाणी व नोटा आढळल्या. सदर रक्कम सुर्या फॅक्टरीच्या कार्यालयातुन चोरल्याची कबुली संशयितांनी दिल्यावर फॅक्टरीचे मालक मुकेश बल्लंवन तेवर (रा. ह.मु. मनरद, ता. शहादा) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खात्री केल्यावर सुमारे दोन लाख 15 हजारांची रक्कम चोरीला गेल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेले संशयित त्यांच्याच कंपनीत काम करत असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. याबाबत सूर्या फॅक्टरीचे मालक मुकेश तेवर यांच्या फिर्यादीवरुन दिनेश तारसिंग ठाकरे (रा. सालदार नगर, शहादा), गणेश हारसिंग गिरासे (रा.लांबोळा, ता. शहादा), भुषण मराठे (रा. रामनगर, शहादा) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., अप्पर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजीत अहिरे, सहाय्यक फौजदार प्रदीपसिंग राजपुत, पोलीस शिपाई विकास शिरसाठ, मिथुन शिसोदे, अमृत पाटील यांनी केली. दरम्यान, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले की, तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबत तिघांची कसून चौकशी करण्यात येत असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळेस कोणी अनोळखी व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.
byMEDIA POLICE TIME
-
0