एका महिन्यात एकाच तांड्यातील 10 बकऱ्यांवर बिबट्याने केला हल्ला; कुसुमवाडाच्या बंजारतांड्यातील घटना!आता तीन बकऱ्यांना केले ठार तर एकीला पळविले.... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : शहादा तालुक्यातील कुसुमवाडा गावातील बंजारातांडा वस्तीत बिबट्याने एका घरात घुसून बकऱ्यांवर हल्ला केला. त्यात तीन बकऱ्या मेल्या आहेत तर एक बकरी बिबट्याने उचलुन नेली आहे. एका महिन्याच्या कालावधित बिबट्याने या वस्तीत आतापर्यंत सुमारे दहा बकऱ्या फस्त केल्या असून गावात दहशत पसरली आहे. मृत बकऱ्यांचे पंचानामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गत महिनाभरापासून तालुक्यातील कुसूमवाडा व कानडी शिवारात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिवरापर्यंत मर्यादित असलेले बिबटे आता चक्क गावात शिरुन पाळिव जनावरे मारु लागली आहेत. 28 जुलैच्या रात्री बिबट्याने कुसूमवाडा गावातील बंजारतांडा वस्तित प्रवेश करुन मुलचंद घासी राठोड यांच्या घराशेजारी बांधलेल्या शेड मधील बकऱ्यांवर हल्ला केला. यात तीन बकऱ्या ठार झाल्या असून एक बकरी बिबट्याने उचलून नेली आहे. मुलचंद राठोड यांचे कुटूंब मजुरी करतात. त्यांनी घरात काही बकऱ्या पाळल्या होत्या. बिबट्याने या बकऱ्या ठार केल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यावर हा नैसर्गिक आघात आहे. तालुका प्रशासना मार्फत या घटनेचा पंचनामा होऊन त्यांना नुकसान भरपाई वा शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या भागात बिबट्यांचे वावर मोठ्या प्रमाणात वाढले असून शेतकऱ्यांना शेतात जायला भीती वाटू लागली आहे. गत एक महिन्यात बिबट्यांनी अनेक पाळीव जनावरे फस्त केली आहेत. बंजारतांडा वस्तीतच सुमारे 10 बकऱ्या या एका महिन्यात बिबट्याने फस्त केल्या आहेत. गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहाद्याचे तहसीलदार दिपक गिरासे यांनी निर्देश दिल्यानुसार वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0