*धडगांवमध्ये बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिवस साजरा* (धडगांव तालुका प्रतिनिधी), 15 नोव्हेंबेर 2024: आज, 15 नोव्हेंबेर रोजी, देशातील आदिवासी समाजाचे प्रेरणादायी नेते आणि स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने, *धडगांव येथील ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन* या सेवाभावी संस्थेने एक कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात बिरसा मुंडा यांच्या विचारांना आणि त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उलगुलान या महाविद्रोहाचे स्मरण करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वजण एकवटून बिरसा मुंडा यांच्या आदर्शांना नमन केले. त्यानंतर, संस्थेच्या समन्वयकांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी बिरसा मुंडा यांच्या बालपणापासून ते त्यांच्या क्रांतिकारी कार्यापर्यंतची संपूर्ण कहाणी सांगितली. बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आदिवासींच्या हक्कांसाठी केलेल्या लढ्याची चर्चा करून त्यांच्या बलिदानाला उजाळा दिला.उलगुलान या महाविद्रोहाचा उल्लेख करताना ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक श्री. शैलेन्द्र वळवी यांनी सांगितले की, हा विद्रोह केवळ एक राजकीय लढा नव्हता, तर तो आदिवासी समाजाच्या अस्तित्वासाठीचा लढा होता. जल, जंगल, जमीन वाचवण्याचा लढा होता. बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक उत्थानासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी आदिवासींच्या स्वतःच्या धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ब्रिटिशांच्या आणि जमीनदार, सावकार यांच्या शोषणापासून मुक्त करण्याचा संकल्प केला. बिरसा मुंडा हे केवळ एक स्वातंत्र्य सेनानीच नव्हते, तर ते आदिवासी समाजाचे देवता समान होते. म्हणून समुदायाने त्यांना धरती आबा, आणि भगवान या नावाने ओळखू लागले. त्यांच्या विचारांनी आजही लाखो आदिवासींच्या जीवनावर प्रेरणा देत आहे.ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशनचे उपाध्यक्ष श्री. युवराज खर्डे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, बिरसा मुंडा यांचे जीवन आणि कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले. आज आपण त्यांच्या कार्याला विसरू शकत नाही. आपण त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवून आपल्या समाजाचे उद्धार करूया, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सर्वजण एकत्र येऊन बिरसा मुंडा अमर रहो, असा नारा लगावला. या कार्यक्रमामुळे बिरसा मुंडा यांच्या विचारांचे प्रसार झाला आणि नवीन पिढीला त्यांच्या कार्याबद्दल जागरूक करण्यात मदत झाली. कार्यक्रमात ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन चे उपाध्यक्ष युवराज खर्डे, प्रकल्प व्यवस्थापक शैलेन्द्र वळवी. समन्वयक आकाश पावरा, दिनेश पावरा, अंकुश वसावे, मनिषा पवरा, किरण पावरा, मिनाक्षी वळवी. तसेच जुमा पराडके, सायसिंग पराडके. आदि मान्यवर उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

