सुसाट फॉर्च्युनरने घेतला आई मुलाचा बळी तर एक गंभीर जखमी, सोबत पाळीव कुत्राही ठार;शहाद्यात धनिक पुत्राचा हिट अँड रनचा प्रताप ... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी)शहादा : शहरातील डोंगरगाव रस्त्यावर शतपावली करणाऱ्या आई व मुलाला भरधाव चार चाकी फॉर्च्युनर वाहनाने मागून धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या श्वानाचाही या अपघातात मृत्यू झाला असून घटनास्थळावरून वाहनासह चालक फरार झाला होता. मात्र नातेवाईकांचा आक्रोश आणि तीव्र संताप पाहून पोलिसांनी आज दुपारी एक वाजता मद्यधुंद वाहन चालक आदित्य उचित पाटील या संशयितास ताब्यात घेतले.काल दि. 17 रोजी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. शहाद्यात हिट अँड रनचा थरार अनुभवणाऱ्या या घटनेने शहादा शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर मद्यधुंद चालकाच्या विरोधात शहादा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वच थरातून होत आहे. दरम्यान शहादा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह घरी आल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश सर्वांची मन हेलावून टाकणारा होता. दुपारी तीन वाजता या माय-लेकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत वृत्त असे की दि. 17 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास डोंगरगाव रस्त्यावरील संजय पावभाजी समोर कल्पना गजानन वाघ (45), मुलगा आकाश गजानन वाघ (19) व भाचा भाविक वसईकर (रा. द्वारकाधीशनगर, शहादा) त्यांच्यासोबत असलेला त्यांचा पाळीव श्वान हे जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर निघालेत. वरील ठिकाणी शतपावली करीत असताना पांढऱ्या रंगाची फॉर्च्यूनर कार क्रमांक एम.एच.15 जे.ए. 5055 वरील मद्यधुंद चालकाने कार भरधाव वेगाने चालवून पायी चालणारे कल्पना वाघ, आकाश वाघ, भाविक वसईकर व श्वान यांना मागून जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की कल्पना वाघ या महिलेला भरदार वेगातील कारने काही अंतर अक्षरशः फरफडत नेले. यात सदर महिलेचा व श्वानाचा जागीच मृत्यू झाला तर आकाश गंभीररित्या जखमी झाला. तसेच भाविकही दुखापती झाला. अपघातानंतर कारचालक पुन्हा भरधाव वेगाने घटनास्थळावरून फरार झाला. परिसरातील नागरिकांनी जखमींना सार्थक हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल केले. मात्र आकाश याची प्रकृती चिंताजनक दिसल्याने त्यास पुढील उपचारार्थ धुळे येथे नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. तर भाविक वसईकर हा जखमी झाला आहे. मयत कल्पना वाघ व आकाश वाघ या माय लेकांना शव विच्छेदनासाठी शहादा ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले. दरम्यान अपघाताची माहिती कर्णोपकरणी पोहोचताच नातेवाईक समाज बांधव मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघाताचे तीव्रता लक्षात घेता पोलीस उपाधीक्षक दत्ता पवार व पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी फौज फाट्यास तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान अपघात करून पसार झालेल्या मद्यधुंद वाहन चालकाचा सर्वत्र शोध सुरू झाला. तत्पूर्वी त्याच्या गाडीचा क्रमांक आणि गाडी कुठली याचा तात्काळ शोध लागला असता शहरातील मलोणी रस्त्यानजीक असलेल्या जॉन डियर ट्रॅक्टर शोरूमचे संचालक उचित पाटील यांचा मुलगा आदित्य उचित पाटील याने अपघात केल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यास त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी तेथून फरार होण्यास मदत केल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान, माय-लेक आणि एका श्वानाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या मद्यधुंद चालकास पोलिसांनी दुपारपर्यंत अटक न केल्यामुळे नातेवाईकांचा संताप तीव्र होत असल्याचे पोलीस प्रशासनास निदर्शनात आले. त्यामुळे दुपारी एक वाजता आरोपी आदित्य उचित पाटील या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात येथील अमरधाममध्ये मयत मायलेकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यासंदर्भात शहादा पोलीस स्टेशनला निलेश गजानन वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॉर्च्यूनर फार चालक आदित्य उचित पाटील याच्या विरोधात भा.न्या.संहिता 106 (1), 281, 125 (A ),105, मोटर वाहन कायदा 184,134, 187, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960चे कलम 11(1) अन्वये गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0