भोई समाज वधू-वर परिचय मेळावा वर्धा येथे उत्साहात संपन्न....** ३ नवविवाहित जोडप्यांना “संसार गिफ्ट” राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते प्रदान — आमदार राजेश बकाने यांच्या उपस्थितीत ३ विवाह सोहळे थाटामाटात संपन्न.. (वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-(अब्दुल कदिर) दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी विदर्भ भोई समाज सेवा संघ, वर्धा यांच्या वतीने आयोजित भव्य उपवर वधू-वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार तसेच विविध सामाजिक उपक्रमांचा एकत्रित कार्यक्रम आकरे सभागृह, पिपरी (मेघे), वर्धा येथे उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या सोहळ्याला राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. पंकज भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ३ नवविवाहित जोडप्यांना संसारासाठी आवश्यक साहित्याचा “संसार गिफ्ट” प्रदान करण्यात आला. तसेच, अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन स्पर्धा परीक्षेच्या उद्घाटन सोहळ्याचाही शुभारंभ याच वेळी करण्यात आला. या मेळाव्यातील विशेष आकर्षण ठरले. देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. राजेश बकाने यांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झालेले तीन विवाह सोहळे. समाजातील परस्पर स्नेह व ऐक्याची ही एक प्रेरणादायी झलक ठरली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष उकंड सोनोने होते. उद्घाटक म्हणून राज्यमंत्री पंकज भोयर तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजेश बकाने, सरपंच वैशाली गौळकार, माजी मागासवर्गीय आयोग सदस्य तथा माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, वर्धा जिल्हा अध्यक्ष रमेश भुरे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष कृष्णा नागपुरे, राजाराम म्हात्रे, पत्रकार रविंद्र पारीसे, मनोहर पचारे, टेकचंद्र मारबते, सुरेश इंगळे, विठ्ठल वानखडे, मारुती पढाल आदी मान्यवर उपस्थित होते. महिला विभागातून विदर्भ महिला अध्यक्षा रंजना पारशिवे, वर्धा कार्याध्यक्ष प्रभा मारबते, जोत्सना बावणे, राजेश्वरी मेश्रे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला ऊर्जादायी वातावरण दिले. पालकमंत्री मा. पंकज भोयर यांनी आपल्या मनोगतात समाजाच्या प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजनांचा उल्लेख करताना सांगितले की, “मच्छीमार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन प्रयत्नशील आहे. विदर्भात किमान १५० मच्छीमार संस्थांची उभारणी व्हावी, तसेच नवीन संस्थांच्या स्थापनेसाठी प्रयत्न व्हावेत,”असे आवाहन त्यांनी विदर्भ भोई समाज सेवा संघाला केले. यावेळी आ. राजेश बकाने यांनी समाजाच्या विकासासाठी ठोस भूमिका मांडताना म्हटले की, “समाजाच्या उन्नतीसाठी एकजुटीने काम करण्याची हीच योग्य वेळ आहे. येत्या काही वर्षांत समाज भवनाच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल,”असे आश्वासन त्यांनी उपस्थित बांधवांना दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मेश्रे व अरुण मेश्राम यांनी तर प्रास्ताविक मनोहर पचारे यांनी केले. आभार प्रदर्शन अनिल आमझरे यांनी सादर केले. या मेळाव्याला संपूर्ण विदर्भासह राज्यभरातून समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पारंपरिक पोशाख, सांस्कृतिक वातावरण आणि एकात्मतेचा संदेश यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व सामाजिक बांधिलकीचे वातावरण पसरले. सामाजिक ऐक्य, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजविकासाच्या नव्या संकल्पनांचा संदेश देत हा वधू-वर परिचय मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.
byMEDIA POLICE TIME
-
0