जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात यावी -बापूसाहेब दीपकभाई पाटील.. (प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी)शहादा : अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेती पिकांचा त्वरित पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी केली आहे.यावर्षी अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचक्रोशीमध्ये गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने सुमारे 100 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतात उभे असलेले कापूस, सोयाबीन, अजवान, मिरची, केळी,ऊस, तुर इत्यादी पिकांचे नुकसान झालेले आहे. कापूस व मका काढणीला आलेला असून अवकाळी पावसामुळे जागेवरच कोंब फुटून बाहेर आले आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे कापूस हे नगदी पीक संपूर्ण वाया गेले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून नेला आहे. मिरची,पपई पिकांवर सततच्या पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झाले आहे. पपई, ऊस, केळी पिकांवर तर जमिनीत साचलेल्या पावसामुळे बुरशी आली आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी, बाजरी, हरभरा पिकांची पेरणी केली असून शेतात जास्त प्रमाणात पाणी साचल्यामुळे उगवणीस आलेले पीक जागीच सडून गेले आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पिकांची दुबार पेरणी करावी लागणार आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करावेत. शेतकरी बांधवांना सरकारने आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी केली आहे.

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात यावी -बापूसाहेब दीपकभाई पाटील..                                                                                           
Previous Post Next Post