ग्राम विकासाचा आधुनिक पॅटर्न दाखविणारा अवलिया... चंद्रकांत दळवी. ( शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी ) सेलू :महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्या तील 'निढळ' हे छोटेसे खेडेगाव. येथील लोकांचे जगण्याचे एकमेव साधन म्हणजे शेती. तीही पावसावर अवलंबुन असणारी. त्यामुळे ज्वारी, बाजरीसारख्या जिरायती पिकांतून जे उत्पन्न मिळेल तेच येथील लोकांच्या जगण्याचे साधन. दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला. अशा अवस्थेत शेतीवर संपूर्ण कुटुंब चालविणे अवघड असल्यामुळे कुटुंबातील एक तरी माणूस कामानिमित्त पुणे-मुंबई सारखी शहरे जवळ करत होता. दुष्काळामुळे गावाची पूर्ण वाताहत झालेली होती. हे सगळे त्या गावातील एक भूमिपुत्र स्वतःच्या डोळ्यात साठवून लहानाचा मोठा होऊन आय.ए.एस. अधिकारी बनतो. पुढे प्रशासकीय सेवेत विविध पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या जन्मगावाचा ग्रामस्थ, लोकसहभाग, लोकवर्गणी व शासकीय योजनेच्या माध्यमांतून कायापालट करतो. हा अवलिया म्हणजेच चंद्रकांत दळवी होय. म्हणूनच लेखक सुनिल चव्हाण यांनी 'निढळ' : ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न हे पुस्तकाला दिलेले शीर्षक सार्थ असेच आहे. ग्रामविकास करायचाच असा ध्यास घेतलेल्या दळवी यांनी लोकसहभागातून ग्रामविकासाचे सूत्र डोळ्यासमोर ठेवून शासकीय योजनांची माहिती मिळवली. ती ग्रामस्थांना पटवून दिली. यातून गावातील लोक गावाच्या विकासासाठी सक्रियरित्या सहभागी होऊ लागले. तसेच गावातील जे लोक नोकरी, व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या शहरांतून विखुरले होते तेही गावाच्या विकासात वेळात वेळ काढून सक्रिय झाले. 'निढळ' हे गाव पूर्णपणे दुष्काळी पट्ट्यात येणारे होते. चंद्रकांत दळवी यांनी ग्राम विकासाच्या घेतलेल्या ध्यासाने गावातील व नोकरी निमित्त बाहेरील लोकांचा सहभाग व शासकीय योजनेच्या माध्यमातून त्यांनी गावातील पाणलोट विकासाचा प्रकल्प यशस्वी केला. त्यामुळे जिरायती शेतीचे बागायती शेतीमध्ये रूपांतर झाले. म्हणूनच नोकरी निमित्त बाहेर पडणारा तरुणांचा ओढा या आमूलाग्र बदलामुळे गावाकडेच वळला व आधुनिक प्रकारची शेती व शेतीशी निगडित दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन इत्यादी पूरक व्यवसायही करु लागला. दळवी यांनी लोकांना अन्न, वस्त्र, निवारा यांच्या इतकेच महत्त्वाच्या असणाऱ्या वीज पुरवठा, पाणीपुरवठा, रस्ते इ. विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या. तसेच व्यायामशाळा, ग्रंथालये, अभ्यासिका, स्मशानभूमी, दफनभूमी, क्रीडांगणे, सभागृहे, सभास्थाने, विविध संस्थांची प्रशस्त कार्यालये निर्माण केली. मोडकळीस आलेल्या विद्यालयांना त्यांनी नवसंजीवनी दिली. त्यातून आधुनिक शिक्षणावर भर दिला. तसेच महिला बचत गट, पुरुष बचत गट, पतसंस्था, सोसायटी, जिल्हा बँकेची ए.टी.एम. सह स्वतंत्र शाखा यांचीही निर्मिती केली. 'निढळ' या गावाने 'संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना'त राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला. तसेच 'हागणदारी मुक्त गाव' केल्यामुळे गावाला राष्ट्रपतींच्या हस्ते 'निर्मल ग्राम' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे 'महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम' या योजनेच्या माध्यमातून चंद्रकांत दळवी यांनी स्वतःच्या गावातील अनेक तंटे, वाद सामोपचाराने, तडजोडीने मिटवले. वेळप्रसंगी त्यांनी स्वतः हा पुढाकार घेऊन काही प्रलंबित तंटे देखील मिटवले. पुढे या गावाला महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'तंटामुक्त गाव' म्हणून गौरवण्यात आले.चंद्रकांत दळवी यांनी व्यसनमुक्तीसाठी विशेषतः दारूबंदीसाठी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न केले. चंद्रकांत दळवी यांनी ग्रामविकासाच्या घेतलेल्या या ध्यासामुळे व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे शासकीय योजनांच्या माध्यमातून गावाला सुजलाम सुफलाम बनवले. म्हणूनच चरितार्थासाठी गाव सोडून शहरात गेलेला नोकरदार वर्ग पाणलोट विकासामुळे नव संजीवनी मिळालेल्या शेतीकडे व तिच्याशी संबंधित पूरक व्यवसायाकडे खेड्याकडे वळला. गांधीजींना जो खेड्यामध्येच भारत दिसला होता त्याचेच हे चित्र म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आजही या 'निढळ' गावच्या धरतीवर इतर गावांचा विकास करण्यासाठी चंद्रकांत दळवी यांनी 'सत्व फाउंडेशन'ची स्थापना केलेली आहे. म्हणूनच ग्रामविकासाचा हा पासवर्ड माहिती करून घ्यायचा असेल तर प्रत्येकाने हे पुस्तक वाचून समजून घेतले पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात, ग्रंथालयात हे पुस्तक असले पाहिजे. या पुस्तकाविषयी नाना पाटेकर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत 'हे पुस्तक कुठेतरी अभ्यासक्रमात असायला पाहिजे' असे म्हणतात ते बरोबरच आहे. एकूणच ग्रामविकास कसा करावा? यासाठी ही माहितीपुस्तिका सर्वांना मार्गदर्शक ठरेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे (शब्दांकन: डॉ. संदीप वाकडे)
byMEDIA POLICE TIME
-
0