शैक्षणिक लूटमारीला लगाम.जळगावच्या आदेशाची राज्यभर अंमलबजावणी करा : -सुराज्य अभियान. (यावल दि.४ ( सुरेश पाटील )राज्यातील अनेक खासगी व निमशासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य,गणवेश, वह्या-पुस्तके,बूट इत्यादी खरेदी करण्याची सक्ती केली जाते.याद्वारे शाळा व्यवस्थापन व व्यापारी यांच्यामध्ये आर्थिक साटेलोटे निर्माण होत असून त्याचा थेट फटका पालकांना बसतो.हा अन्याय रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याला यश मिळाले असून जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांनी अशा सक्तीविरोधात सर्व सरकारी आणि खासगी शाळांना स्पष्ट आदेश निर्गमित केला आहे. असा आदेश केवळ जळगावपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभरात लागू करावा, अशी मागणी ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अधिवक्ता निरंजन चौधरी, माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. नरेंद्र सपकाळे, ‘सुराज्य अभियाना’चे श्री. माधव सावलानी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजानन तांबट उपस्थित होते. या आदेशानुसार, आता कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही. विद्यार्थ्यांना कुठल्याही दुकानातून साहित्य घेण्याचे स्वातंत्र्य असेल. शिक्षण हक्क कायद्यानुसार अशा सक्तीला कायदेशीर मान्यता नाही दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी.अशी सक्ती करणार्‍या शाळांवर व संचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. गरज वाटल्यास शाळेची मान्यता रहित करण्याचा विचार करावा. पालक व विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी ‘टोल फ्री’ क्रमांक किंवा ई-मेल सुविधा उपलब्ध करून द्यावी. तक्रारदाराचे नाव व माहिती गोपनीय ठेवून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, तर विद्यार्थ्यांची आर्थिक लुटमार रोखली जाऊ शकते, असा विश्वास ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा आणि पालकांमध्ये जागृती करणार २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ‘लोक आदालती’मध्ये याविषयीची तक्रार ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या तक्रारीची दखल घेत शिक्षणाधिकार्‍यांनी तात्काळ सदर आदेश निर्गमित केला. अशा प्रकारची सक्ती केली जाणार नसल्याबाबतचा जागृतीपर फलक शाळांच्या दर्शनी भागात लावण्याचाही आदेश देण्यात आला आहे. या आदेशाची जिल्ह्यात तात्काळ अंमलबजावणी केली जावी. यासाठी ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने प्रशासनाचा पाठपुरावा केला जाणार आहे. यासह या आदेशाविषयी पालकांमध्ये जनजागृतीही करण्यात येणार आहे.असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सुराज्य अभियान हिंदू जनजागृती समितीचे प्रमुख प्रशांत जुवेकर यांनी म्हटले आहे.

शैक्षणिक लूटमारीला लगाम.जळगावच्या आदेशाची राज्यभर अंमलबजावणी करा : -सुराज्य अभियान.            
Previous Post Next Post