**भव्य विज्ञान प्रदर्शनाने *इकरा उर्दू* प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल उजळून निघाले. (मानवत / वार्ताहर.{ अनिल चव्हाण }*————————————*मानवत येथे दिनांक 4 ऑक्टोबर रोजी विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या युगात विद्यार्थ्यां मध्ये संशोधन वृत्ती, जिज्ञासा आणि सृजन शीलतेचा विकास होणे ही काळाची गरज आहे. याच हेतूने *इकरा उर्दू* प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूलमध्ये भव्य सायन्स एक्झिबिशन 2025 चे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी डॉ. एम. ए. रिजवान सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी यावेळी आपल्या उद्घाटन पर भाषणात विद्यार्थ्यांच्या विज्ञानावरील प्रेमाची दखल घेत त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. "विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्य पुस्तकापुरते न राहता विज्ञान प्रत्येक्ष अनुभवातून शिकावे, यासाठी अशा प्रदर्शनांचे महत्त्व अनन्य साधारण आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 52 विज्ञान प्रकल्प सादर केले. लहान वयातील या विद्यार्थ्यांनी दाखवलेली सृर्जनशीलता आणि प्रयोगशील वृत्ती पाहून उपस्थित सर्वच मान्यवर भारावून गेले. यावेळी प्रदर्शनात मानवी शरीरातील अवयवांची कार्यप्रणाली, प्रदूषणाचे दुष्परिणाम व त्यावर उपाय, सौरमाला, जलशुद्धीकरण प्रणाली, दैनंदिन जीवनातील समस्यांचे वैज्ञानिक निराकरण, अशा विविध विषयांवर सुंदर वर्किंग मॉडेल्स सादर करण्यात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी तर आपला प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित करून दाखवत उपस्थितांना विज्ञानाची जादू प्रत्यक्ष अनुभवायला लावली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील आत्मविश्वास व प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य. लहानशा वयात विज्ञानाच्या गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या पद्धतीने सादर करून त्यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली.या विज्ञान मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिराज अली खान यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे विज्ञान शिक्षक इम्रान कुरेशी व शेख निलोफर मॅडम यांनी अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रकल्प उभारणीस प्रवृत्त केले. या बरोबर शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी एकदिलाने मेहनत घेऊन हा उपक्रम संस्मरणीय बनवला. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालक, स्थानिक मान्यवर, तसेच विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृती व मॉडेल्सचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. अखेर या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करून, त्यांच्या कल्पकतेला नवी दिशा दिली. समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञानाचा उपयोग व्हावा, या संकल्पनेची ही सुंदर प्रचिती उपस्थितांना अनुभवायला मिळाली. या भव्य विज्ञान प्रदर्शनामुळे इकरा उर्दू प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक उपक्रमांची गुणवत्ता आणि वेगळेपण सिद्ध केले.***
byMEDIA POLICE TIME
-
0