आमदार देवतळे यांच्या प्रयत्नांना यश; नंदोरी (बु.) इंदिरानगर बंधाऱ्यास १.९७ कोटी रुपयांची मंजुरी. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ,)भद्रावती दि.31:-प्रतिनिधीतालुक्यातील मौजा नंदोरी (बु.) येथील शिर नदीच्या पलीकडे वसलेल्या इंदिरानगर वार्डातील नागरिकांना गेल्या दहा वर्षांपासून दळणवळणाच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वर्षभर पाणी असलेल्या शिर नदीमुळे नंदोरी किंवा तालुक्याच्या इतर भागात ये-जा करताना धोका निर्माण होत होता. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी वेळोवेळी आंदोलने केली, तर काही वेळा मतदानावर बहिष्कारही टाकला. या दीर्घकालीन समस्येला आता दिलासा मिळाला असून, करण देवतळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे इंदिरानगर–नंदोरी (बु.) जोडणाऱ्या बंधाऱ्याच्या कामासाठी १.९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पूर्वी चांदा ते बांदा योजनेअंतर्गत या नदीवर बंधाऱ्याचे काम मंजूर झाले होते. मात्र निधीअभावी कंत्राटदाराने काम थांबवल्याने प्रकल्प अर्धवट राहिला. या प्रलंबित मुद्द्यावर स्थानिक नागरिकांनी आमदार देवतळे यांना निवेदन देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमदार देवतळे यांनी नंदोरी (बु.) व इंदिरानगर येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा व पत्रव्यवहार करून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत काम मंजूर करण्याची शिफारस केली. या प्रयत्नांना यश आले असून, सदर कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मंजूर निधीतून मृद व जलसंधारण विभागामार्फत बांधकाम सुरू होणार आहे. या बंधाऱ्यामुळे इंदिरानगर व नंदोरी (बु.) यांच्यातील दळणवळण सुधारेल, प्रवास सुरक्षित होईल आणि स्थानिक विकासाला गती मिळेल. निधी मंजुरीची माहिती मिळताच नंदोरी (बु.) व इंदिरानगर येथील नागरिकांनी आमदार करण देवतळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. “दहा वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. हा बंधारा आमच्या भागाच्या विकासाचा नवा अध्याय ठरेल,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0