हिंगणघाट गॅस गोडाऊन चोरी प्रकरण उघड; १२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त. हिंगणघाट :--दिनांक १४ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान हिंगणघाट येथील गॅस एजन्सीमध्ये झालेल्या चोरीचा छडा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी लावला असून गुन्ह्यात वापरलेले अंदाजे १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे.याप्रकरणी फिर्यादी सुभाष बहादचंद खत्री (वय ६५, रा. कोचर वॉर्ड, हिंगणघाट) यांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दिली होती. फिर्यादी यांनी दिनांक १४/१२/२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता गॅस एजन्सी बंद करून घरी गेले होते. त्यानंतर दिनांक १५/१२/२०२५ रोजी सकाळी ९.२५ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने एजन्सीमध्ये प्रवेश करून नगदी ३ लाख ६१ हजार रुपये चोरी करून नेल्याचे निष्पन्न झाले.या तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप.क्र. १७९६/२०२५ अन्वये भा.न्या.सं. (BNS) कलम ३३४, ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.गुन्हा अज्ञात आरोपीने केल्याने स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी समांतर तपास सुरू केला. घटनास्थळी मिळालेल्या माहिती व तांत्रिक विश्लेषणातून चोरीसाठी निळ्या रंगाची बिना नंबरची चारचाकी वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात ही गाडी हुंडाई अल्ट्रा (i20) कार क्रमांक यूपी ७८ ईआर ४४५५ असल्याचे समोर आले.सदर वाहनाच्या मालकाकडे चौकशी केली असता, त्यांनी दिनांक १४/१२/२०२५ रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास आरोपी मुकुल सुरेशराव वासनिक (पसार) याने सदर वाहन भाड्याने घेतल्याचे सांगितले. त्यानुसार दोन पंचांच्या उपस्थितीत गुन्ह्यात वापरलेले अंदाजे १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन जप्त करून पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.ही कारवाई मा. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि प्रकाश लसुन्ते, पोहवा शेखर डोंगरे, पो.शि. विकास मुंडे, पो.शि. सुगम चौधरी, पो.शि. शुभम राऊत तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर विभागातील दिनेश बोथकर, अनुप कावळे व अंकित जिभे यांनी पार पाडली.

हिंगणघाट गॅस गोडाऊन चोरी प्रकरण उघड; १२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त.                                                                
Previous Post Next Post