आशीर्वादापासून पदग्रहणापर्यंत विकासाचा संदेश; हिंगणघाट नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. डॉ. नयना उमेश तुळसकर यांचं पदग्रहण..! हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. समीरभाऊ कुणावार यांच्या पुढाकारातून नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा स्वागत, आशीर्वचन व पदग्रहण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि ऐतिहासिक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. हा कार्यक्रम शहराच्या राजकीय आणि प्रशासकीय वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.कार्यक्रमाची सुरुवात आमदार कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित स्वागत व आशीर्वाद सोहळ्याने झाली. या ठिकाणी पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत पूजाविधी संपन्न करण्यात आला. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना उत्तम आरोग्य, मानसिक बळ, निर्णयक्षमता आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ऊर्जा लाभावी, यासाठी परमेश्वराचे आशिर्वाद घेण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या मंगलमय अधिष्ठानामुळे संपूर्ण कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि सकारात्मक दिशा प्राप्त झाली.पूजाविधीनंतर आमदार श्री. समीरभाऊ कुणावार, हिंगणघाट नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. डॉ. नयना उमेश तुळसकर, सिंदी (रेल्वे) नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. राणी स्नेहल कलोडे, हिंगणघाट व सिंदी (रेल्वे) नगरपरिषदांचे भाजप–आर.पी.आय. (अ) युतीचे सर्व विजयी नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका, तसेच मान्यवर नागरिक यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालयाकडे उत्साहात मार्गक्रमण करण्यात आले. नागरिकांचा सहभाग, घोषणाबाजी आणि सकारात्मक वातावरणामुळे शहरात नव्या पर्वाची चाहूल लागल्याचे चित्र दिसून आले.नगरपरिषद कार्यालयात आमदार समीर कुणावार, मुख्याधिकारी श्री. प्रशांत उरकुडे यांच्या उपस्थितीत सौ. डॉ. नयना उमेश तुळसकर यांनी नगराध्यक्ष पदाचा विधिवत पदग्रहण स्वीकारला. हा क्षण हिंगणघाटच्या प्रशासकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. पदग्रहण सोहळ्यानिमित्त नगरपरिषद प्रांगणात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला आमदार श्री. समीरभाऊ कुणावार, भाजप वर्धा जिल्हाध्यक्ष श्री. संजय गाते, हिंगणघाट नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. डॉ. नयना उमेश तुळसकर, सिंदी (रेल्वे) नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. राणी स्नेहल कलोडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. प्रशांत उरकुडे, तसेच हिंगणघाट नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये विजयी झालेले सर्व ४० नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. यासोबतच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, पत्रकार बंधू, व्यापारी बांधव, युवक-युवती, महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमादरम्यान आमदार समीर कुणावार यांनी उपस्थितांना संबोधित करताना हिंगणघाट नगरपरिषदेच्या मागील कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. रस्ते विकास, वाहतूक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित सुविधांबाबत करण्यात आलेल्या कामांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. पुढील काळातही नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या माध्यमातून विकासाची ही गती अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच हिंगणघाट नगरपरिषद ही केवळ वर्धा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात सुशासन आणि विकासाचे आदर्श उदाहरण ठरेल, अशा प्रकारचे नियोजनबद्ध व पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न राहील, असे आमदार कुणावार यांनी स्पष्ट केले.नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण स्वीकारल्यानंतर बोलताना सौ. डॉ. नयना उमेश तुळसकर यांनी आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विकासकामे, नागरी सुखसुविधा, मूलभूत सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. आमदार कुणावार यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकार्याची छाप नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.हा संपूर्ण कार्यक्रम हिंगणघाट शहराच्या विकासासाठी एकजुटीचे, सकारात्मक राजकारणाचे आणि लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक ठरला असून, येणाऱ्या काळात शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नवी दिशा देणारा ठरेल, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

आशीर्वादापासून पदग्रहणापर्यंत विकासाचा संदेश; हिंगणघाट नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. डॉ. नयना उमेश तुळसकर यांचं पदग्रहण..!               
Previous Post Next Post