रावेरमध्ये शाळा परिसरात लोंबकळत्या विद्युत तारा : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात (जळगाव जिल्हा प्रतिनिधी ) शहरातील डी.एम. मॅरेज हॉल समोर असलेल्या शाळा परिसरात महावितरणच्या विद्युत तारांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या लोंबकळत्या तारांमुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका वाढला आहे. महावितरणच्या सर्व्हिस लाईनच्या विद्युत तारा तब्बल १० ते १५ फूट खाली लोंबकळत असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू आहे.या रस्त्यावरून दररोज दोन हजारांहून अधिक विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. मात्र लोंबकळलेल्या तारांमुळे विद्यार्थी, पालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाऱ्याच्या झोतासोबत या तारा जोरजोरात हलताना दिसतात. कधीही तुटून खाली पडतील, अशी धास्ती नागरिक व्यक्त करीत आहेत.काही ठिकाणी तारा इतक्या खाली आहेत की उंच वाहन गेल्यास थेट संपर्क येण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे जीवघेणा अपघात घडू शकतो. विशेष म्हणजे, या गंभीर बाबीकडे स्थानिक नागरिक व पालकांनी अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महावितरणच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.“एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोणाची?” असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत. शाळा परिसर असल्याने येथे लहान मुले, मुली, पालक व शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा संवेदनशील ठिकाणी विद्युत सुरक्षेबाबत आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असताना महावितरणकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.अपघात घडण्याची वाट न पाहता महावितरण व प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून लोंबकळलेल्या विद्युत तारांची दुरुस्ती करावी व त्या सुरक्षित उंचीवर नेाव्यात, अशी जोरदार मागणी विद्यार्थी, पालक व नागरिकांकडून होत आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे._______________________________या दरम्यान एका पत्रकार बांधवानी स्वतः महावितरणच्या अधिकाऱ्यांना दोन दिवस दोन वेळा फोन करून शाळा परिसरात लोंबकळलेल्या विद्युत तारांची माहिती दिली व तातडीने तारांची उंची वाढवण्याची मागणी केली. मात्र तरीही महावितरणकडून कोणतीही हालचाल न झाल्याने “पत्रकारांचा फोन करूनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर सामान्य जनतेचे काय?” असा रोखठोक सवाल उपस्थित केला जात आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0