ज्योती विद्यामंदिर महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नसुरक्षा रक्षक नेमणूक व सीसीटीव्ही बसविण्याची जोरदार मागणी.. (यावल तालुका विभागीय संपादक यासीन तडवी):- सांगवी बुद्रुक (ता. यावल) येथील ज्योती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावल रस्त्यालगत असलेल्या या महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. मात्र, महाविद्यालयाच्या मुख्य गेटजवळ अद्याप कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच संपूर्ण शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसणे किंवा काही ठिकाणी बसविलेले कॅमेरे कार्यरत नसल्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत पालक व नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तात्काळ सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, तसेच संपूर्ण शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते नियमितपणे कार्यरत ठेवावेत, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. सध्या बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावेत, असेही निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसंबंधी कोणतीही अनुचित अथवा विपरीत घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शाळा प्रशासनावर राहील, असा गंभीर इशाराही यावेळी देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास वरिष्ठ शिक्षण अधिकारी, महिला आयोग व पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन किंवा आमरण उपोषण करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत महाविद्यालय प्रशासनाने तातडीने ठोस आणि परिणामकारक पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिक, पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.या संदर्भात आज महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0