**ग्रामपंचायत पिंपळगाव येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न*. (वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुलकदीर*). दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत पिंपळगाव येथे ग्रामसभा उत्साहात व यशस्वीपणे पार पडली. सभेची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. शत्रुघ्न उईके, सौ. विमलबाई उईके तसेच विधवा महिला श्रीमती रेणुका चौधरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.ग्रामसभेमध्ये प्लास्टिकमुक्त ग्रामपंचायत या उद्देशाने महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. याअंतर्गत गावातील जुने कपडे गोळा करून त्यापासून कापडी पिशव्या शिवून त्या प्रत्येक कुटुंबाला मोफत वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच शासनाच्या ५० टक्के थकीत करामध्ये सूट देण्यासंबंधी शासन निर्णयाचे वाचन करून नागरिकांना थकीत व चालू कर भरण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कर भरण्यास सुरुवात केली. कर भरण्यासाठी ग्रामपंचायतीने क्यूआर कोड सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याचा लाभ घेतला. या सुविधेबद्दल ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून ग्रामपंचायतीमार्फत वनराई बंधारा उभारण्यासाठी सर्व नागरिकांना श्रमदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यास उपस्थित नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत श्रमदानासाठी तयारी दर्शवली.या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक श्री. मिनेश जाधव साहेब होते. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रफुल इखार, माजी सरपंच श्री. पुरुषोत्तमजी वरटकर, महिला बचत गट सीआरपी श्रीमती पिंपळकर, महिला बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव, संगणक परिचालक श्री. प्रफुल राऊत, कर्मचारी श्री. आकाश लिटकर, श्री. विशाल घ्यारे, रोजगार सेवक श्री. ओमप्रकाश कुमरे तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0