राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात.. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.14 : तालुक्यातील सेंट अॅन्स हायस्कूल, सुमठाणा येथे मंगळवारी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक हक्क व जबाबदाऱ्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.२४ डिसेंबर रोजी भद्रावती शहरातील यशवंतराव शिंदे महाविद्यालयात तहसील कार्यालय भद्रावती तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विधी करमरकर हिचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या उमर हनफी यालाही सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास सेंट अॅन्स हायस्कूल सुमठाणाच्या मुख्याध्यापिका मर्सी थॉमस तसेच उपमुख्याध्यापिका अॅन्सी डेवास्सीया उपस्थित होत्या. याप्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावतीचे अध्यक्ष प्रविण चिमुरकर यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना ग्राहक दिनाचे महत्त्व, ग्राहकांचे हक्क व जबाबदाऱ्या याबाबत माहिती दिली.राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मायक्रॉन स्कूल, साई कॉन्व्हेंट भद्रावती, साई कॉन्व्हेंट एकता नगर तसेच यशवंतराव शिंदे विद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा, भद्रावतीचे अध्यक्ष प्रविण चिमुरकर, सचिव वतन लोणे, भारत खोब्रागडे, सोनल वावरे, करूणा मोघे, गुरूदेव बावणे, विनोद ठमके, डॉ. ज्ञानेश हटवार व प्रतिक्षा बनकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात..                                                    
Previous Post Next Post