बावीस वर्षांनंतर २००३–०४ बॅचचा अनोखा संगमकर्मवीर विद्यालय माजरी येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन व कृतज्ञता सोहळा उत्साहात.,,. (माजरी प्रतिनिधी, )दि. २२ जानेवारी २०२६महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती दि. 22:- माजरी – येथील कर्मवीर विद्यालयात तब्बल बावीस वर्षांनंतर २००३–०४ या शैक्षणिक वर्षातील दहावी उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व कृतज्ञता सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणारा हा सोहळा माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.शालेय जीवनात एकत्र घालवलेले क्षण, वर्गातील गमती-जमती, परीक्षा, खेळाचे मैदान, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्र-मैत्रिणींची साथ या सर्व आठवणींना या कार्यक्रमात पुन्हा एकदा जिवंतपणा आला. आज विविध क्षेत्रांत—कोणी अधिकारी, शिक्षक, पत्रकार, शास्त्रज्ञ, पोलीस दलात कार्यरत—अशा वेगवेगळ्या भूमिका निभावणारे माजी विद्यार्थी पुन्हा एकाच छताखाली एकत्र आले होते.कार्यक्रमाची सुरुवात उपस्थिती नोंदणी व प्रार्थनेने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेष आकर्षण ठरले ते माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे पाय धुऊन, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत केलेले आदरयुक्त स्वागत. या दृश्याने अनेकांच्या डोळ्यांत भावनांचे पाणी तरळले.या सोहळ्याचे अध्यक्षस्थान कर्मवीर विद्यालय माजरीचे मुख्याध्यापक संतोष चौके सर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक व माजी प्राचार्य बुरान सर, पारखी सर, धवणे सर, दातारकर सर, कुलकर्णी सर, टिपले सर, वाघाडे सर, निंबुळकर सर, खेकारे सर, बोरीकर सर, काळे सर, वानखेडे मॅडम, कांबळे मॅडम तसेच इतर मान्यवर शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी व सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असलेले पंकज आत्राम यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी अमोल पारखे यांनी केले. आपल्या मनोगतात अनेक माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आज आपण योग्य ठिकाणी पोहोचल्याची भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पहिली ते दहावीपर्यंत शिकवणारे सर्व माजी शिक्षक एकाच मंचावर पाहण्याचा दुर्मिळ योग. हे दृश्य पाहून अनेक माजी विद्यार्थी व शिक्षक भावूक झाले. जुन्या आठवणींना उजाळा देत, किस्से सांगत, हास्य-विनोदात कार्यक्रम रंगत गेला.यानंतर स्नेहभोजन, विविध खेळ व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून कार्यक्रमात अधिक रंगत आली. वर्गातील खेळ, गमती-जमती आणि शालेय स्पर्धांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.कार्यक्रमाची सांगता चैतन्य कोहळे यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने करण्यात आली. या अनोख्या स्नेहसंमेलनाची चर्चा परिसरात सर्वत्र होत असून, कर्मवीर विद्यालय माजरीच्या इतिहासात हा सोहळा एक संस्मरणीय अध्याय ठरल्याचे बोलले जात आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0