महसुल विभाची कारवाई!टोकन की, रेती ? ऑर्डनन्स गेट ३ वर गोंधळ उघड.. (!महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती.. ) भद्रावती दि.25 :-भद्रावती शहरातील चांदा ऑर्डनन्स फॅक्टरी गेट क्रमांक ३ परिसरातून सुरू असलेली विनापरवाना रेती तस्करी महसूल प्रशासनाच्या कारवाईत उघडकीस आली आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीलगतच्या जंगलव्याप्त भागातून अवैधरीत्या रेती उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे महसूल प्रशासनाने पहाटेच्या सुमारास सापळा रचून धडक कारवाई केली. सदर कारवाईत टी.पी., रॉयल्टी अथवा कोणताही वैध परवाना नसताना जंगल परिसरातून आणलेली रेती व संबंधित वाहन जप्त करण्यात आले. जप्ती पंचनाम्यानुसार हा प्रकार शासन नियमांचे थेट उल्लंघन ठरतो. ही कारवाई तहसीलदार संदीप मानमंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत कर्तव्यदक्ष तलाठी खुशाल मस्के, आर.आय. अनिल दडमल, शुभम धात्रक तसेच वाहनचालक बंडु वेवफुलवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आशिवाय महसूल प्रशासनाच्या नोंदीप्रमाणे, जप्त करण्यात आलेली रेती ही गेट क्रमांक ३ च्या बाहेरील जंगलव्याप्त परिसरातून उत्खनन करून आणण्यात आली होती. सदर रेती वाहतूक करणारे तस्कर हे भद्रावती तालुक्यातील सुमठाणा परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात वाहनचालक किशोर कुळमेथे व वाहनमालक ऋषिकेश गोरे (रा. भद्रावती) यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ऑर्डनन्स फॅक्टरी गेट क्रमांक ३ येथून ये-जा करण्यासाठी टोकन प्रणाली लागू असताना, याच मार्गाचा वापर अवैध रेती वाहतुकीसाठी झाल्याने टोकन व्यवस्थेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच, बॉम्बनिर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अतिसंवेदनशील परिसरात अशा प्रकारची बेकायदेशीर वाहतूक कशी सुरू होती, याबाबतही चर्चा सुरू आहे. तसेच जंगलव्याप्त परिसरातून रेती उत्खनन होत असताना वनविभागाला याची माहिती होती की नाही, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे भद्रावती शहरातील अवैध रेती तस्करीवर नियंत्रण येणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0