रुग्णालयात फळवाटप करून पत्रकार दिन साजरा..! (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.6:- मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, भद्रावती शाखा (मुंबई तालुका शाखा) यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. सन १८३२ मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून सत्यनिष्ठ आणि निर्भीड पत्रकारितेचा पाया घातला. त्यांच्या विचारांचा वारसा जपत पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना ताजी फळे देण्यात आली. यामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या वेळी पत्रकार बांधवांनी लोकहितासाठी सत्य व निस्पक्ष पत्रकारिता करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमास रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष सिंग तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी पत्रकार संघाच्या या समाजोपयोगी पुढाकाराचे कौतुक केले. या वेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, भद्रावती शाखेचेसरचिटणीस सुनील दैदावार, कार्याध्यक्ष संतोष शिवणकर तसेच शाम चटपल्लीवार, महेश निमसटकर, पुंडलिक येवले, अनिल इंगोले, विनोद वांढरे आदी सदस्य सहभागी झाले होते. तसेच मराठी पत्रकार दिन हा केवळ उत्सव नसून पत्रकारितेच्या मूल्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. भद्रावतीत राबवलेला हा उपक्रम पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी दर्शवणारा ठरला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0