शहाद्यात हादरा! चाकूच्या धाकाने दोन चिमुरड्यांचे अपहरणाचा प्रयत्न; मुलांच्या धाडसाने फसला डाव:. (प्रा. डी. सी. पाटील, नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक)शहादा : शहादा शहर आणि परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे. डोंगरगाव रोड परिसरात काल रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. दोन अज्ञात महिलांनी धारदार चाकूचा धाक दाखवून दोन निष्पाप बालकांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या चिमुरड्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 7.30 ते 8 वाजेच्या सुमारास डोंगरगाव रोड परिसरात दोन संशयास्पद महिला हातात चाकू घेऊन फिरत होत्या. याचवेळी घराबाहेर खेळत असलेल्या चि. श्रेयस तुषार सनंसे आणि चि. दर्शन सतनामसिंग या दोन बालकांना त्यांनी लक्ष्य केले. चाकूचा धाक दाखवून, धमकावून मुलांना पळवून नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, श्रेयस आणि दर्शन यांनी घाबरून न जाता अत्यंत धैर्याने प्रतिकार केला. चाकूचा वार चुकवत त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि जोरात आरडाओरडा केला. मुलांचा आवाज ऐकून त्या दोन्ही महिला घटनास्थळावरून पळून गेल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि निवृत्त उपप्राचार्य प्रा. डी. सी. पाटील यांनी तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि तपास सुरू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या 4-5 दिवसांपासून शहादा परिसरात अशा संशयास्पद हालचाली सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचे आवाहन :या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. पालकांनी आपल्या लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये. मुलांना अशा संकटांची जाणीव करून द्यावी आणि स्वसंरक्षणाचे प्राथमिक धडे द्यावेत. परिसरात कोणताही अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. शहाद्यात घडलेली ही घटना संपूर्ण परिसरासाठी इशारा आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने छडा लावून आरोपींना गजाआड करावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

